माजी संचालकांची १५ एप्रिलला ‘पणन‘पुढे सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:42+5:302021-04-05T04:20:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांवरील जबाबदारी निश्चितीला पणन संचालक सतीश सोनी यांनी ...

माजी संचालकांची १५ एप्रिलला ‘पणन‘पुढे सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांवरील जबाबदारी निश्चितीला पणन संचालक सतीश सोनी यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
बाजार समितीच्या २०१८-१९च्या लेखापरीक्षणात दोष आढळले होते, त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधकांकडे आलेल्या तक्रारीनुसार संबंधित कारभाराची चौकशी करण्यात आली. यामध्ये समितीचे आर्थिक नुकसान व निधीचा दुरूपयोग झाल्याचे नमूद केलेले आहे. या नुकसानाला तत्कालिन पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर जबाबदारी निश्चितीसाठी एका व्यक्तीची न्यायाधिकरण म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी नेमणूक केली होती. या कारवाईला माजी संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, तेथून माघार घेत पणन मंत्र्यांकडे दाखल केले. पणन मंत्र्यांकडे सुनावणी हाेऊन हे प्रकरण पणन संचालकांच्याकडे आले. पणन संचालकांकडे सुनावणी झाली. माजी संचालक कृष्णात पाटील यांच्यामार्फत वकिलांनी म्हणणे सादर केले. जिल्हा उपनिबंधकांनी कारवाई करताना आमचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचे सांगितले. पणन संचालकांनी त्यांचे मान्य करत कारवाईला तात्पुरती स्थगिती देत १५ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.