राशिवडे गावतलावाचे स्वास्थ्य बिघडले; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:50+5:302020-12-24T04:21:50+5:30
राशिवडे गावच्या सौंदर्यात भर घालणारा येथील शिवकालीन तलावाची दुरवस्था झाली आहे. या तलावास संपूर्ण कठडा असून, त्यावरती विद्युत रोषणाईसाठी ...

राशिवडे गावतलावाचे स्वास्थ्य बिघडले; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
राशिवडे गावच्या सौंदर्यात भर घालणारा येथील शिवकालीन तलावाची दुरवस्था झाली आहे. या तलावास संपूर्ण कठडा असून, त्यावरती विद्युत रोषणाईसाठी पथदिवे बसविले आहेत. तलावाच्या सभोवताली फूटपाथ असून, सामाजिक काम करणाऱ्या तरुणांनी शोभेची झाडे लावली आहेत. सायंकाळी तलावावर फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तर परिसरातील गावांना या तलावाचे मोठे अप्रुप आहे. मात्र, काही दिवसांपासून या तलावास अवकळा आली आहे. गणेश मंदिरासमोरील संरक्षक भिंत पडून चार वर्षे लोटली, पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या तलावात शेवाळ साचले असून, त्याचा जाड थर तयार झाला आहे. या थराने पाण्याचे आरोग्य बिघडले आहे. तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत, तर पाण्याचा उग्र वास येत आहे. शोभेची झाडे ही दुर्लक्षित झाल्याने ती वाळू लागली आहेत. अनेक कुटुंबांनी तलावावर साहित्य साठविल्यामुळे कचऱ्याचे ठीग साचले आहेत. तलावाच्या काठावर ट्रक, टेम्पो ट्रॅक्टर, शेती औजारे अस्ताव्यस्त लावली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या सर्वांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मोठ्या प्रमाणात झालेली तलावाची दुरवस्था ग्रामपंचायतीला कशी दिसत नाही, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.