Headmaster killed, accident on Mangur-Benadi road | मुख्याध्यापक ठार, मांगुर-बेनाडी रोडवर अपघात
मुख्याध्यापक ठार, मांगुर-बेनाडी रोडवर अपघात

ठळक मुद्देअपघातात मुख्याध्यापक ठार, मांगुर-बेनाडी रोडवर अज्ञात वाहनाची दूचाकीला धडक

कोल्हापूर : सासरवाडीला दूचाकीवरुन जात असताना मांगुर-बेनाडी (ता. चिक्कोडी) रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. भाऊसो आण्णासो रांगोळे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा अरव हा जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी, भाऊसो रांगोळे हे कासा-पाटीलपाडा (ता. डहाणु, जि. पालघर) येथे आदिवासी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. १ मे रोजी त्यांचा जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक म्हणून सत्कार केला. उन्हाळी सुट्टी पडल्याने ते पत्नी व मुलगा असे मिळून गावी पट्टणकोडोली येथे आले होते. त्यांची पत्नी माहेरी बेनाडी-कर्नाटक येथे गेल्या होत्या. त्यामुळे ते रविवारी रात्री दूचाकीवरुन मुलगा अरव याला घेवून बेनाडीला निघाले. मांगुर-बेनाडी रोडवर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. बापलेक दोघेही जागेवर बेशुध्द पडले.

या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांनी त्यांना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने भाऊसो रांगोळे यांचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अरव हा जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत. वडील मृत झालेची कल्पनाही त्याला दिलेली नाही. मनमिळावू आणि नेहमी सहतमुख भाऊसो यांच्या अपघाती मृत्यूने पट्टणकोडोली गावावर शोककळा पसरली.
 

 


Web Title:  Headmaster killed, accident on Mangur-Benadi road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.