हातकणंगले, नेजला पाणीटंचाई
By Admin | Updated: September 7, 2014 23:24 IST2014-09-07T20:35:58+5:302014-09-07T23:24:30+5:30
नदीवरील पाणी उपसा बंद : ग्रामस्थांची १५ दिवस गैरसोय

हातकणंगले, नेजला पाणीटंचाई
आळते : नदीवरील पाणी उपसा बंद पडल्याने गेले पंधरा दिवस झाले हातकणंगले, नेज, शिवपुरी या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांत पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीच पर्यायी व्यवस्था न केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय, राजकीय यंत्रणा सुस्त झाल्याने पाण्याचा प्रश्न आणखीनच गंभीर झाला आहे.
१९९६पासून हातकणंगले पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. या योजनेमध्ये नेज, शिवपुरी, हातकणंगले या गावांचा समावेश आहे. वारणा नदीतून वरील गावांना पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र नळपाणी योजना अस्तित्वात आहे. एक दिवस आड करून संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या २३ दिवसांमध्ये दोनवेळा पाणी उपसा करणारा पंप बंद पडला. त्यामुळे पाण्याबाबत नागरिकांचे ऐन पावसाळ्यात हाल होत आहेत. कूपनलिका, विहिरीचे पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी
या गावचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावांचा कार्यभार असल्याने हातकणंगले ग्रामपंचायतीकडे ते पुरेसा वेळ देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतून या ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या वरिष्ठ अधिकारी व राजकीय प्रतिनिधींनी या पाणीप्रश्नामध्ये लक्ष घालून हातकणंगले, नेज, शिवपुरी या गावांचा पाणीप्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी गावातील नागरिकांतून होत आहे.