हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला धोका नाही; ९७ व्या घटना दुरुस्तीत कलम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 13:01 IST2019-11-28T13:00:24+5:302019-11-28T13:01:29+5:30
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर राहता येणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता ...

हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला धोका नाही; ९७ व्या घटना दुरुस्तीत कलम रद्द
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर राहता येणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. जुन्या सहकार कायद्यानुसार मंत्र्यांना लाभाच्या पदावर राहता येत नव्हते; पण ९७ व्या घटनादुरुस्तीमध्ये हे कलमच रद्द केल्याने मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला धोका नाही.
एका सहकारी संस्थेवर अध्यक्ष म्हणून काम करत असताना दुसऱ्या सहकारी संस्थेवर अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही. असा सहकार कायदा आहे. त्याचबरोबर राज्यमंत्री मंडळातील मंत्र्यांना जिल्हास्तरीय संस्थेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक म्हणून राहता येत नाही, असे सहकार कायदा कलम ७३ मध्ये नमूद होते.
सध्या महाराष्ट विकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळणार आहे; त्यामुळे मुश्रीफ यांना जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष म्हणून राहता येणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे; पण २०१४ ला ९७ वी घटना दुरुस्ती झाली, यामध्ये हे कलमच रद्द केले आहे; त्यामुळे मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला कोणताही धोका नसल्याचे सहकारतज्ज्ञांचे मत आहे.