Hasan Mushrif's information: Zilla Parishad should not be discredited | कोविड खरेदीची होऊ शकते चौकशी, हसन मुश्रीफ यांची माहिती

कोविड खरेदीची होऊ शकते चौकशी, हसन मुश्रीफ यांची माहिती

ठळक मुद्देकोविड खरेदीची होऊ शकते चौकशी, हसन मुश्रीफ यांची माहिती जिल्हा परिषदेची बदनामी नको

कोल्हापूर : कोविड काळामध्ये जिल्ह्यामध्ये जी खरेदी झाली. त्यावर लेखा परीक्षणामध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग किंवा शासनाकडून चौकशी होऊ शकते, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेची सरसकट बदनामी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ यांना पत्रकारांनी कोविड खरेदीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा केली. ते म्हणाले, कोरोना कालात कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी धाडसाने काम केले. ५० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात कुठेही नाही, परंतु आपल्या जिल्ह्यात रेमडेसिवेरची इंजक्शन्स मोफत वितरित करून नागरिकांची सोय करण्यात आली. खासगी दवाखाने बंद होते तेव्हा शासकीय रुग्णालयांनीच चांगली सेवा बजावली. यावेळी शासनानेच अशा पद्धतीने समिती करून खरेदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

या खरेदीबाबत लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत. दरातील तफावतीबाबतही काही तक्रारी आहेत. याची चौकशी होवू शकते. मात्र यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांची काही भूमिका नव्हती. हा सर्व कारभार अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी केली जाऊ नये, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होतो

या खरेदीबाबतची चर्चा त्याचवेळी माझ्या कानावर आली होती. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही या खरेदीवर लक्ष ठेवा असे बोललो होतो. आता लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार जी काय चौकशी होणार असेल ती होऊ दे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Hasan Mushrif's information: Zilla Parishad should not be discredited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.