Hasan Mushrif ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ईडीने उचलले, मुश्रीफांच्या अडचणी वाढणार?
By विश्वास पाटील | Updated: February 2, 2023 18:12 IST2023-02-02T18:07:22+5:302023-02-02T18:12:56+5:30
बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी एकत्र झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली व अधिकाऱ्यांना बाहेर नेण्यास विरोध केला

Hasan Mushrif ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ईडीने उचलले, मुश्रीफांच्या अडचणी वाढणार?
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए.बी.माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांनी ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी उचलले. त्यांना ताब्यात घेवून पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. त्यास कर्मचारी संघटनेने विरोध केल्याने बँकेच्या आवारात कमालीचा तणाव निर्माण झाला.
ईडीच्या पथकातर्फे बँकेची बुधवारपासून तपासणी सुरु आहे. या बँकेचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळात बँकेने कांही साखर कारखान्यांना चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवला आहे. ईडीच्या अठरा अधिकाऱ्यांचे पथक बँकेत ठाण मांडून आहे. त्यांनी बुधवारी रात्री अधिकाऱ्यांनाही घरी जावू दिले नव्हते.
मुख्य कार्यालयाशिवाय काही शाखांचीही झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक आर.जे.पाटील यांच्यासह अन्य तिघांना समन्स बजावून ताब्यात घेण्यात आले. साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करणारा विभाग, बिगर कर्ज या शाखेचे हे अधिकारी आहेत.
बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी एकत्र झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली व अधिकाऱ्यांना बाहेर नेण्यास विरोध केला. परंतू पोलिसांच्या बंदोबस्तात या अधिकाऱ्यांना मुंबईला हलवण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. बँकेच्या इतिहासात प्रथमच अशी कारवाई झाली आहे.