मुश्रीफांचे कार्यकर्ते, नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास: रोहित पवार

By पोपट केशव पवार | Published: August 24, 2023 01:18 PM2023-08-24T13:18:03+5:302023-08-24T13:19:22+5:30

उद्योजकांनी परजिल्ह्यात जागा मागितल्याचा गौप्यस्फोट

harassment to entrepreneurs by hasan mushrif activists relatives said rohit pawar | मुश्रीफांचे कार्यकर्ते, नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास: रोहित पवार

मुश्रीफांचे कार्यकर्ते, नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास: रोहित पवार

googlenewsNext

पोपट पवार, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याने या उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जागा मागितल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची आज शुक्रवारी कोल्हापुरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आ.पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसींमधील उद्योजकांना मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक त्रास देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे अनेक दिवसांपासून येत आहेत. पक्ष एकसंघ असताना आम्ही जिल्ह्यातील संबंधित नेत्याशी याबाबत बोललोही होतो. पण, त्यांनी वेगळीच कारणे सांगितली. उद्योजकांना त्रास दिला जात असल्याने ते कोल्हापुरात उद्योगाचा विस्तार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परजिल्ह्यात विस्तारीकरणासाठी हे उद्योजक जागा मागत आहेत. नेत्यांचे कार्यकर्तेच जर असा त्रास देत असतील तर या जिल्ह्यात उद्योग, रोजगार कसा निर्माण होईल. कोल्हापुरचा दसरा चौक ऐतिहासिक असून येथून देशाला, राज्याला संदेश देण्यासाठीच खा. पवार यांची या चौकात सभा होत आहे.  यावेळी आमदार विद्या चव्हाण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार, अनिल घाटगे उपस्थित होते. 

१९९८ ला विरोध असतानाही उमेदवारी दिली

१९९८ ला हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यास पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही शरद पवार यांनी आपल्या विचारांचा माणूस असल्याने उमेदवारी दिली. जिल्ह्यातून केवळ आपणच निवडूण आलो तर मंत्रिपद मिळेल अशा प्रवृत्तीमुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाचा विस्तार खुंटला, मात्र, अशा प्रवृत्तीचे नेते दुसऱ्या गटात गेल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचा श्वास मोकळा झाला आहे, या शब्दांत आ.पवार यांनी  मुश्रीफ यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाना साधला.

भाजपचा  कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने फोडाफोडी

भाजपचा स्वत:च्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्यानेच ते इतर पक्षातील कार्यकर्ते, नेते आयात करत असल्याचा टोला पवार यांनी लगावला. महाविकास आघाडी एकसंध असून भाजपविरोधात लढण्याचा संदेश देण्यासाठीच शरद पवार यांची स्वतंत्र सभा होत असल्याचे आ.पवार यांनी स्पष्ट केले. 

शाहू महाराजांची उपस्थिती विचार पेरण्यासाठी

आजच्या शरद पवार यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असले तरी त्यांची ही उपस्थिती राजकीय नाही. शाहू महाराजांची विचारधारा भाजपविरोधातील आहे.  हाच विचार देण्यासाठी ते या सभेला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्टीकरण आ.पवार यांनी दिले. 

आ.पवार उवाच

-चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर शास्त्रज्ञांचे नाव कुणीही घेत नाही हे दुर्देवी आहे.
- येत्या पंधरा दिवसात शिक्षक-प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु केली नाही तर रस्त्यावर उतरणार
-कोल्हापुरच्या दंगलीतून पुरोगामी विचारधारा संपवण्याचा डाव, पण कोल्हापुरकरांनी तो उधळला
-

Web Title: harassment to entrepreneurs by hasan mushrif activists relatives said rohit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.