अर्धअंध आन्दूमामाचा वनवास संपता संपेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:42+5:302021-06-09T04:30:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : दोन वर्षांपूर्वी मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन जीवन संपवले. त्या धक्क्यातून सावरत असताना ...

अर्धअंध आन्दूमामाचा वनवास संपता संपेना!
लोकमत न्यूज नेटवर्क,
पोर्ले तर्फ ठाणे : दोन वर्षांपूर्वी मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन जीवन संपवले. त्या धक्क्यातून सावरत असताना दोन दिवसांपूर्वी पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला. मुलगा आणि पत्नीच्या जाण्याने पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील अर्धअंध आनंदा शंकर हांडे यांचा म्हातारपणीचासुद्धा जीवनाचा वनवास काही संपता संपेना. त्यांचे उर्वरीत आयुष्य अंधारमय बनले आहे. प्रत्येकाला वाटतं असते की देवाने आपल्याचं वाट्याला संघर्षमय जीवन दिले आहे; परंतु या जगात संघर्षमय जीवनाच्या कथित कहाण्या काही कमी नाही.
अर्धअंध असणाऱ्या आन्दूमामाचे आयुष्य जन्मापासून संघर्षमय आणि वेदनादायी आहे. दोन वर्षांचा असताना ताप आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असताना त्यांच्या शरीरात जीव आला. अगदी मागितल्यासारखा त्यांचा पूनर्जन्म झाला. या संकटात मात्र त्यांचा उजवा डोळा गेला. दुसऱ्या डोळ्याची दृष्टी कमी झाली. दिव्यांगपणामुळे शाळेचा पायरी न चढलेल्या आन्दूमामाला अजूनसुद्धा कोण काम न सांगेल तो आळसा म्हणायचा. गरिबीमुळे पोटासाठी रोजगार, दोन जनावरे सांभाळत वेळप्रसंगी चाकरमानी करत परिस्थितीबरोबर जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
अडाणी आईवडिलांचा फायदा घेत त्यांच्या मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. दोन वर्षांपूर्वी त्याने व्यसनाधिनतेत जीवन संपवले. त्याला एक मुलगी आहे. उतारवयात कर्ताधर्ता मुलगा गेल्याने त्याचं जगणं आणखी मुश्किल बनत गेले. आठवड्यापूर्वी पत्नी शालाबाईला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते; परंतु गरिबीने काबाडकष्ट करून थकलेले शरीर औषधोपचाराला साथ देत नव्हते.
अखेर तिला कोरोनाने कवटाळल्याने अर्धांगिनीच्या जाण्याने त्यांचा धीर खचून गेला आहे.
कोरोनाने अनेक कुटूंब उद्ध्वस्त केली आहेत. त्यापैकी त्यांच्या पत्नीच्या जाण्याने त्यांचे जगणं ही उद्ध्वस्त झाले आहे. त्यांनी अंधपणावर मात करून जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धीराने तोंड दिले; परंतु नियतीच्या प्रत्येक डावात त्यांच्या वाट्याला दु:खचं आले आहे. आज नाही तर उद्या चांगले होईल या आशेवर त्याचं जगणं सुरू होते; पण मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूने आपल्या माणसासाठी पोरका झालेल्या एकट्या आन्दूमामाच्या जगण्याचा वनवास आणखी वाढला आहे.