म्हाकवे : हळदी (ता. कागल) येथील सर्वच पक्षांच्या गटप्रमुखांनी एका जाजमवर येत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच येथील निवडणूक बिनविरोध होत आहे.
४ हजाराहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात २१४० मतदान आहे. गतवेळी मंडलिक-संजयबाबा गटाची, तर मुश्रिफ-रणजित पाटील गटाची युती होऊन चुरशीने निवडणूक झाली होती. मात्र, यामुळे गावात तसेच भावकीत वादाचे प्रसंग येतात, त्यामुळे निवडणूक बिनविरोधसाठी सर्वांनीच निसंकोचपणे सहमती दिली आहे.
मंडलिक, मुश्रिफ, संजयबाबा गटाला प्रत्येकी दोन जागा, तर पाटील गट, राजे गट, लाल बावटा यांना प्रत्येकी एक जागा, अशा बलाबलाचा प्रस्ताव आहे. सरपंचपद हे ५ वर्षे मंडलिक गटाकडे असेल. उपसरपंचपद २ वर्षे मुश्रिफ गट यांना, तर संजयबाबा गट, पाटील व राजे गटाला प्रत्येकी एक वर्षभर संधी मिळणार आहे.
यासाठी प्रा. संभाजी मोरे, संतोष भारमल, मनोहर पोतदार, बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब कानकेकर, हणमंत कुंभार, बाबूराव बोरड, भास्कर पाटील, बाळासाहेब पोतदार, सुरेश कांबळे, सुनील गोरुले, संतोष शेटके या गटप्रमुखांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. त्यासाठी अरुण मगदूम, संतोष पोवार, उत्तम व्हरांबळे, पिंटू कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले.