Kolhapur: उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्त्यासाठी लवकर पर्यायी मार्ग काढू, पालकमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:31 IST2025-05-13T16:31:34+5:302025-05-13T16:31:52+5:30
संतप्त ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांवर सरबत्ती

Kolhapur: उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्त्यासाठी लवकर पर्यायी मार्ग काढू, पालकमंत्र्यांचे आश्वासन
कोल्हापूर : सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या १५ तारखेच्या दौऱ्यात किमान हलक्या वाहनांना परवानगी देण्याबाबत उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता सुरू करण्याची विनंती करण्याचा तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पर्यायी मार्ग लवकर होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी ग्रामस्थांना दिले.
युद्धजन्य स्थितीत कोल्हापूरविमानतळ परिसरातील उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी विशेषाधिकार वापरून १० मेपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रस्त्याला विरोध नाही मात्र पर्यायी रस्ता लवकर द्या, तोपर्यंत किमान हलक्या वाहनांचा मार्ग बंद करू नये, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी तासभर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यात पालकमंत्री आबिटकर, आमदार अमल महाडिक यांनी मध्यस्थी करत गुरुवारपर्यंतची वेळ मागून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोकूळ संचालक प्रकाश पाटील यांच्यासह तामगावचे सरपंच लक्ष्मण हराळे, राजू माने, महेश पिंपळे, लल्ला गवते, रावसाहेब पाटील, विठ्ठल पुजारी, विश्वास तरटे, हेमंत पाटील, अमोल गवळी, अभिजित मोहळकर, विकी मुजावर, भाईजान अन्सारी, बाळू गुरव, बाजीराव गंगाधर, दीपक देशमुख, अनिल पाटील, दीपक जाधव, माणिक जोंधळेकर, तानाजी सासने, संपत सासने आदी उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
ऋतुराज पाटील, अमल महाडिक एकत्र
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा आणि नियोजन बैठकीच्या निमित्ताने कट्टर विरोधक समोरासमोर आले. जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत आणि त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी त्यांच्याशी चर्चा केली होती. याच बैठकीत आमदार अमल महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांनीही एकत्र येत, ग्रामस्थांची बाजू घेत पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जमीन देणाऱ्या ग्रामस्थांचीच वाट बंद
विमानतळासाठी जमीन देणाऱ्या ग्रामस्थांचीच पावसाळ्याच्या तोंडावर वाट बंद केल्याने सर्व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पर्यायी रस्ता दिल्यानंतरच रस्ता बंद करण्याचे आश्वासन देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर ते न पाळल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. प्रशासनाने समझोता करार करावा, तोपर्यंत ग्रामस्थ बाहेर थांबतील, अशी आग्रही भूमिका ग्रामस्थ घेत होते.