दादा तुम्हाला अनुभव काय, तुम्ही काय दिवे लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:57+5:302021-04-05T04:21:57+5:30
कोल्हापूर : तत्कालीन सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री असताना तुमच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आदी खाती होती. त्यावेळी तुम्हाला या कामाचा ...

दादा तुम्हाला अनुभव काय, तुम्ही काय दिवे लावले
कोल्हापूर : तत्कालीन सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री असताना तुमच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आदी खाती होती. त्यावेळी तुम्हाला या कामाचा काय अनुभव होता. कोल्हापूरचा कायापालट करताना तुम्ही काय दिवे लावले. ठाकरे घराण्यावर टीका शिवसेना खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अपघाताने मुख्यमंत्री झाल्याची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
पवार म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने पाटील यांनी व विरोधी पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या संकटात सरकारबरोबर हातात हात घालून काम करणे अपेक्षित होते. मात्र, दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शाबासकी मिळवण्यासाठी अशी बेताल वक्तव्ये दोन्ही नेते करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यावेळी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद घेतले नव्हते. अनेक कार्यकर्त्यांना मंत्रीपदाची संधी दिली. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीही अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. केवळ सत्ता हाती नसल्याने भाजपला पोटशूळ उठला आहे. दादांनी आपल्या सत्तेच्या काळात शून्य कारभार केला. त्यामुळे त्यांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. त्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच राहोत, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत.
दादांवर भानामती झाली आहे, त्यामुळे ते बरळत आहेत. दिल्ली दरबारी बक्षीस मिळवण्यासाठी हा अट्टाहास सुरु आहे. प्रत्येकवेळी ठाकरे घराण्यावर टीकेचे अस्त्र सोडले तर शिवसेना खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, याची जाणीव भाजपने ठेवावी, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुजित चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष मनजित माने आदी उपस्थित होते.