सोनगेकरांच्या ग्रामनिधीवर ग्रामसेविकेचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:53+5:302021-01-22T04:21:53+5:30
म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथील ग्रामसेविका स्मिता जाधव यांनी ग्रामनिधी व नपापु यामध्ये ...

सोनगेकरांच्या ग्रामनिधीवर ग्रामसेविकेचा डल्ला
म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथील ग्रामसेविका स्मिता जाधव यांनी ग्रामनिधी व नपापु यामध्ये हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत सीईओ डॉ. अमन मित्तल यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली. मात्र, जाधव यांना कार्यमुक्त करा, अशी मागणी उपसरपंच जयसिंग पाटील यांनी केली आहे. एकाच महिन्यात दिवाबत्तीवर १७ हजारांचा खर्च, पाणी योजनेच्या लिकेजवर (गळती) वारेमाप खर्च, आठवडाभरात कर्मचाऱ्यांना दोनवेळा बोनस वाटप, आवश्यक साहित्य खरेदीचे धनादेश हे संबंधित दुकानदार, फर्म अथवा कंपनीच्या नावे न काढता ते आपल्याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नावे काढले आहेत.
अनेक कारभारात भ्रष्टाचार केल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून निष्पन्न झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
विस्तार अधिकारी कुंभार तसेच गटविकास अधिकारी संसारे, उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र, याबाबत कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे डॉ. मित्तल यांच्याकडे १२ डिसेंबर रोजी दाद मागितल्याचे पाटील यांनी सांगितले.
चौकट-
निलंबन होईपर्यंत पाठपुरावा करणार
पाटील सीईओ यांनी त्यांची तात्काळ बदली केली. मात्र, हा गंभीर प्रकार असून, संबंधित ग्रामसेविका निलंबित होईपर्यंत पाठपुरावा करू. विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ग्रामपंचायत दप्तराची वरिष्ठांनी तपासणी केली आहे. यामध्ये काहीही गैरव्यवहार आढळलेला नाही. केवळ नाहक बदनाम करत जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. नोकरीच्या ठिकाणाहून ये-जा करण्यासाठी मी सोयीची बदलीही मागितली आहे.
स्मिता जाधव, ग्रामसेविका, सोनगे