गगनबावड्याचा ग्रामसेवक निलंबित

By Admin | Updated: July 9, 2015 00:42 IST2015-07-09T00:42:40+5:302015-07-09T00:42:40+5:30

नियमबाह्य प्रकरण : ‘लोकमत’चा पाठपुरावा, सीईओंची कारवाई, आजी-माजी सरपंचही रडारवर

Gramsevak suspended from the sky | गगनबावड्याचा ग्रामसेवक निलंबित

गगनबावड्याचा ग्रामसेवक निलंबित

कोल्हापूर : गगनबावडा ग्रामपंचायतीत नियमबाह्य, अनियमित, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामसेवक एन. डी. खोत यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी निलंबित केले. गैरव्यवहाराचा ठपका असलेले आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यही कारवाईच्या रडारावर आहेत.
ग्रामपंचायत गगनबावडामधील गट नंबर ६, ३४, ३५ व मुलकी पड गट नंबर ५ मधील बोगस लिलाव विक्री व बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत सामाजिक वनीकरण विभागाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार खोत यांनी कार्यवाही केली नाही. संबंधित मक्तेदार यांनी परवानगीपेक्षा ७० ते ८० टक्के जादा वृक्षतोड केली. त्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामपंचायतीमध्ये दप्तर नमुना नंबर १ ते २७ ठेवलेले नाही. २० नोव्हेंबर २०१४ मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यावेळी करवसुली फक्त १९ टक्के इतकी कमी केल्याचे निदर्शनास आले. मासिक सभा इतिवृत्तांत आॅगस्ट २०१४ पर्यंत लिहिला आहे. मात्र त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नव्हत्या. सप्टेंबर-आॅक्टोबर २०१४ मधील मासिक सभा इतिवृत्तांत लिहिले नाहीत. राजर्षी शाहू प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडील अभिलेखांचे वर्गीकरण केलेले नाही.
बेकायदेशीर कामकाजाच्या अनुषंगाने जबाबदार असणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ नुसार कारवाई करण्यासंबंधी विभागीय आयुक्त (पुणे) येथे प्रकरण आहे. त्यामध्ये तक्रारदार यांनी सादर केलेल्या ग्रामपंचायतीकडील कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची पडताळणी ग्रामपंचायतीकडील मूळ अभिलेखावरून करण्यासाठी खोत यांना ३० जून २०१५ रोजी आयुक्तांकडे उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. मात्र, खोत २ जुलै २०१५ अखेर उपस्थित राहिले नाहीत. या आणि त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामकाजामुळे त्यांना निलंबित केले. निलंबन कालावधीत त्यांना शाहूवाडी पंचायत समितीमध्ये काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे.


कारवाईच्या
रडारवर हे आहेत...
सरपंच अंकिता अरुण चव्हाण, उपसरपंच अरुण हरेंद्र चव्हाण, सदस्य राजेंद्र दशरथ गवळी, सबाना रफिक जमादार, मोहिद्दीन इस्माईल डांगे, चित्रा चंद्रकांत पोतदार, गणेश धनाजी कांबळे, पांडुरंग भागोजी आडुळकर, आनंदा कोयनाप्पा डफडे या विद्यमान पदाधिकाऱ्यांची, तर माजी सरपंच सौ. बतुल इब्राहिम मुकादम, आजी व माजी उपसरपंच अरुण हरेंद्र चव्हाण, माजी सदस्य यशवंत वसंत पेंढारकर, अशोक तुकाराम वरेकर, विलास उमाजी कांबळे, तानाजी मल्हारी पाटील, सुनीता भागोजी डफळे, जरिना हमीद खलीफ, शकिला सलीम जबादार यांच्यावर गैरव्यवहार, कर्तव्यात कसूर, अक्षम्य हयगय, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची हानी, अतिक्रमणास प्रोत्साहन दिले, असे महत्त्वाचे आरोप आहेत. आयुक्तांकडील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर यांच्यावरील कारवाई स्पष्ट होणार आहे.
‘लोकमत’मध्ये डिसेंबर महिन्यात मालिका
गगनबावडा ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहार, प्रशासनाकडून कारवाईबाबत होणारी दिरंगाई यासंबंधी दोन भागांत ‘लोकमत’ने डिसेंबर २०१४ मध्ये मालिका प्रसिद्ध करून प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर ‘लोकमत’ प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावाही करीत राहिले.

Web Title: Gramsevak suspended from the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.