‘ग्रामरक्षक दल’ रोखणार गावातील अवैध दारू धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:00+5:302021-04-05T04:21:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागात अगर पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी ...

‘Gramrakshak Dal’ will stop illegal liquor trade in the village | ‘ग्रामरक्षक दल’ रोखणार गावातील अवैध दारू धंदे

‘ग्रामरक्षक दल’ रोखणार गावातील अवैध दारू धंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामीण भागात अगर पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्रामरक्षक दला’ची स्थापना करण्यात येणार आहे. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने हा नवा उपक्रम हाती घेण्यात येत असून, त्यासाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाऊल उचलले आहे. ग्रामीण पातळीवर गावठी हातभट्टी दारूचे अड्डे काही नेत्यांच्या आश्रयाने सुरू असल्याचे आढळले. त्याला चाप बसविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी वाड्या-वस्त्यांमध्ये गावठी दारू बनविण्याच्या हातभट्ट्या राजरोसपणे पेटलेल्या आहेत. त्या रोखणे अपुऱ्या पोलीस संख्येमुळे आवाक्याबाहेर आहे. या गावठी दारूच्या हातभट्ट्या जेसीबी मशीनद्वारे पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या तरीही पुढील दोन-तीन दिवसांत पुन्हा याच हातभट्ट्या पुन्हा पेटलेल्या असतात. त्यामुळे कितीही कारवाई केली तरीही पुन्हा या हातभट्ट्या गाळण्याचा व्यवसाय सुरूच असतो. त्या दारू धंदेवाल्यांची परिसरात दहशत प्रचंड असते. त्यामुळे त्यांच्याविरोेधात सर्वसामान्य तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.

जिल्ह्यातील अपुरे पोलीस संख्याबळ पाहता हातभट्ट्यावर वारंवार जाऊन कारवाई करणे पोलीस दलास शक्य नाही. या दारू धंदेवाल्यांना चाप बसविण्यासाठी याशिवाय देशी-विदेशी दारूची तस्करी, अवैध दारू विक्री हे सर्व अवैध व्यवसाय थांबविण्यासाठी पोलीस दलातर्फे जिल्ह्यात प्रत्येक गावस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येत आहे. २०१७ मध्ये शासनाने कायदा करून अशा पद्धतीने ग्रामरक्षक समितींना अधिकार दिले आहेत. त्याचा आधार घेत आता गावपातळीवर चांगली वर्तणूक असणाऱ्या आठ-दहा लाेकांची समिती करून त्या समितीद्वारे हातभट्टी अगर अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न आहे. पोलीस दलाच्या वतीने पुढील तीन महिन्यांचा कारवाईचा आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

चोवीस तासांत कारवाई

गाव पातळीवर नेमल्या जाणाऱ्या ‘ग्रामरक्षक दल’च्या समितीने पोलीस ठाण्याकडे संबंधित हातभट्टी अगर अवैध दारू व्यावसायिकांविरोधात तक्रारी करायची आहे, अगर त्यांनी गोपनीय माहिती कळवायची आहे. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत हद्दीतील पोलीस ठाण्यामार्फत तेथे छापा टाकून कारवाई करण्यात येणार आहे.

कोट...

पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने वारंवार हातभट्ट्या उद्ध्वस्त करताना अगर कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे गावपातळीवरच ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यांना काही प्रमाणात कारवाईचे अधिकार देण्यात येतील. त्याबाबतचा नियोजित आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा

दोन वर्षांतील जिल्ह्यातील दारूबंदीची कारवाई

वर्षे - दाखल - उघड - टक्के

२०१९- १४४७-१४४७- १००

२०२०-१६८२-१६८१-९९

Web Title: ‘Gramrakshak Dal’ will stop illegal liquor trade in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.