ग्रामपंचायत इमारत धोकादायक
By Admin | Updated: December 5, 2014 23:38 IST2014-12-05T20:48:48+5:302014-12-05T23:38:38+5:30
कुंभोज ग्रामपंचायत : ग्राम सचिवालय उभारण्यात अडथळा

ग्रामपंचायत इमारत धोकादायक
कुंभोज : येथील ग्रामपंचायत कार्यालयाची ३७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आर.सी.सी. इमारत धोकादायक बनल्याने पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, तसेच कर्मचारी जीव मुठीत घेऊन दैनंदिन कामकाज करीत आहेत. कार्यालयाची जागाच ग्रामपंचायतीच्या नावावर नसल्याने नवी ग्राम सचिवालयाची इमारत उभारण्याचे ग्रामपंचायतीचे आजवर केवळ स्वप्नच बनून राहिले आहे. याकामी ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या पाठपुराव्यास अद्यापही यश मिळालेले नाही.
सुमारे १५ हजार लोकसंख्या असणाऱ्या कुंभोज गावच्या ग्रामपंचायतीची कार्यालय इमारत १९७७ साली बांधण्यात आली. सध्या या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालयाशिवाय तलाठी कार्यालय, तसेच नगर भूमापन कार्यालयाचा संसार चालला आहे. तथापि, सर्वच कार्यालयांचे अपुऱ्या जागेत कामकाज सुरू असताना या इमारतीच्या बहुतांश छताच्या खालील बाजूच्या स्लॅबचे ढपले पडून सळई उघड्या पडल्या आहेत. ग्रामपंचायतीसमोरील छत (पोर्च) केव्हाही कोसळेल, अशा अवस्थेत आहे. परिणामी, प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज जीव मुठीत धरून सुरू आहे.
या जागी ग्रामसचिवालय इमारत उभारण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली जागा जिल्हा परिषद अर्थात ग्रामपंचायतीच्या नावावर न झाल्याने या इमारतीच्या निर्लेखनास बांधकाम खाते परवानगी देण्यास तयार नाही. जागा नावावर होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा सुरू केला असला, तरी अद्याप हे काम तहसील व भूमापन कार्यालय या दोन्हींत चेंडू बनून रेंगाळल्याचे समजते. या कामी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नास स्थानिक आमदार, खासदार यांचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे.
ग्राम सचिवालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकतेच सहकार, तसेच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, याकामी खा. राजू शेट्टी व आमदार सुजित मिणचेकर यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
- माधवी नंदकुमार माळी,
सरपंच, कुंभोज.
ग्रामपंचायत इमारत धोकादायक