सत्ताधाऱ्यांनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या:हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:57 IST2018-09-17T00:57:05+5:302018-09-17T00:57:21+5:30

सत्ताधाऱ्यांनी गरिबांसाठीच्या योजना बंद केल्या:हसन मुश्रीफ
सेनापती कापशी : वीस वर्षे आमदार त्यातही पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विधानसभेत कायदे केले व विकासाचा स्तर कायमपणे वाढवत गेलो. पण, गेली चार वर्षे विरोधी सरकार आल्यामुळे गोरगरीब जनतेसाठी आम्ही सुरू केलेल्या योजना आमच्या डोळ्यांदेखत बंद पडत आहेत. विकासकामांवरही दूरगामी परिणाम झाला आहे. जनतेने याची गंभीर दखल घेऊन वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गणरायाच्या कृपेमुळे जर पुन्हा संधी मिळालीच, राज्यात जर आमचे सरकार सत्तेवर आलेच तर बंद पडलेल्या सर्व योजना तर पुन्हा चालू करणारच आहे. याशिवाय सहाशे रुपयांची पेन्शन दोन हजार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यांच्या हस्ते बेलेवाडी काळम्मा ते माध्याळ या रस्त्याचा, स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्याचा, दलित वस्तीतील गटर बांधकाम, आदी कामांचा प्रारंभ तसेच उज्ज्वल गॅस योजनेतील लाभार्थींना गॅसचे वाटप करण्यात आले.
मुश्रीफ म्हणाले, उज्ज्वल योजनेंतर्गत सर्वसामान्य महिलांना मिळणाºया गॅस टाकीला सबसिडी नाही. सुरुवातीला मोफत मिळाल्यानंतर महिन्याला साडे आठशे रुपये देऊन गॅसटाकी विकत घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या योजनेअंतर्गत वाटप झालेल्या लाभार्थींना गॅसच्या टाकीला ५० टक्के सबसिडी मिळाली पाहिजे, सरपंच सागर पाटील यांनी प्रास्ताविक, तर आर. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हरी पाटील, हिंदुराव मुदाळकर, आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोटांनी भरलेली गाडी घेऊन फिरावे लागेल
रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यावरचे खड्डे पाहून मला लाज वाटते, असे वक्तव्य केले होते. गडकरींना याची लाज वाटली, पण या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना लाज वाटत नाही. उलट ते खड्डा दाखवा आणि दहा हजार मिळवा असे आवाहन करीत आहेत. रस्त्यावरचे खड्डे जर पाहिले तर त्यांना नोटांनी भरलेली गाडी घेऊनच फिरावे लागेल, अशी अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची झाली आहे.