Kolhapur: गिरीश जाधव यांच्या शस्त्रसंग्रहासाठी तीन कोटी, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:05 IST2025-01-02T12:05:04+5:302025-01-02T12:05:24+5:30
कोल्हापूर : ख्यातनाम शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव यांचा शस्त्रसंग्रह संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी ...

Kolhapur: गिरीश जाधव यांच्या शस्त्रसंग्रहासाठी तीन कोटी, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचा निर्णय
कोल्हापूर : ख्यातनाम शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव यांचा शस्त्रसंग्रह संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले होते. मूळचे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील असलेल्या जाधव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या शस्त्रसंग्रहासाठी व्यतीत केले होते. याची दखल घेत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यसैनिक ल. मा. जाधव यांचे चिरंजीव असलेल्या गिरीश जाधव यांनी रसायनशास्त्राचा अभियंता म्हणून शिक्षण घेऊन विपणन क्षेत्रात काम केले. परंतु इतिहासप्रेमातून दुर्मीळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करण्याचा छंद त्यांना जडला. यातून देशभरामध्ये खेड्यापाड्यातून फिरून त्यांनी विविध शस्त्रास्त्रे संकलित केली. प्रत्येक शस्त्राची सविस्तर माहिती, त्या शस्त्राचा कालावधी याचा त्यांनी अभ्यास केला. ही सर्व शस्त्रे केवळ आपल्याकडे न राहता ती समाजासमोर यावीत, नव्या पिढीला हा सर्व इतिहास समजावा, यासाठी त्यांनी ‘शौर्य गाथा’ या नावाने महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही या शस्त्रात्रांचे प्रदर्शन मांडावयास सुरुवात केली.
इतिहासकालीन शस्त्रास्त्रे या विषयावर पुस्तकाचे लेखनही त्यांनी सुरू केले होते. तसेच शिवकालीन इतिहास आणि शस्त्रास्त्रांची माहिती देणारे केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतु वयाच्या ७५व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्रसंगी कौटुंबिक गरजा बाजूला ठेवून जाधव यांनी आपली मिळकत या संग्रहासाठी वापरली होती. या त्यांच्या इतिहासप्रेमाची दखल घेत त्यांच्या निधनानंतर त्यांनी संकलित केलेला हा इतिहासाचा अमोल ठेवा संवर्धित व्हावा, यासाठी हा साडेतीन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.