शासकीय यंत्रणेने लाखाचे केले बारा हजार, भरपाईवर मारली काट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:08 IST2019-06-22T12:03:22+5:302019-06-22T12:08:52+5:30
धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत लाखाचे झाले बारा हजार ही म्हण तंतोतंत जुळली आहे.

शासकीय यंत्रणेने लाखाचे केले बारा हजार, भरपाईवर मारली काट
सागर गुजर
सातारा : धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. दोन्ही विभागांच्या या बार्गेनिंगमध्ये येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत लाखाचे झाले बारा हजार ही म्हण तंतोतंत जुळली आहे.
मालगावमधील शेतकरी देवेंद्र कल्याण कदम यांचे उकिरड्याचे शेणखत, हळद बियाणे, कडबा, जळण असे मिळून मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनाम्यात हे नुकसान १ लाख ८३ हजार इतके नोंदवले. तर पाटबंधारेने हेच नुकसान केवळ ४३ हजार रुपयांवर घसरवले. संजय कृष्णा कदम यांचे महसूलच्या पंचनाम्यात ४ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
मात्र, पाटबंधारे विभागाने हेच नुकसान १ लाख ३५ हजार रुपये इतके दाखवले.
मधुकर आनंदराव कदम यांच्या शेताचा बांध वाहून गेला. शेतातील ऊस पिकाचेही नुकसान झाले. महसूलच्या पंचनाम्यानुसार ८ लाखांचे नुकसान झाले असताना पाटबंधारे विभागाने मात्र हेच नुकसान १ लाख ३५ हजार रुपये इतके म्हणजे निम्म्यापेक्षा कमी दाखवले आहे. शंकर सीतामाम यादव यांचे तर ४ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले. तेच पाटबंधारे विभागाने बार्गेनिंग करून अवघ्या ८७ हजारांवर आणले आहे.
प्रकाश भिकूलाल कदम यांचे ४ लाख २० हजारांचे नुकसान झाले असताना त्यांना पाटबंधारे विभागाने मोठा झटका देत अवघे पाच हजारांचे नुकसान दाखवले आहे. धर्माजी साहेबराव देशमुख यांच्या शेतातील ताल वाहून गेल्याने २ लाख ५0 हजारांचे नुकसान झाले. तेच नुकसान केवळ १५ हजार रुपये इतके कमी दाखविण्यात आले आहे.
मालगाव ग्रामपंचायत हद्दीमधील मालगाव-अंबवडे रस्ता पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने वाहून गेला होता. हेच नुकसान महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार १ लाख ६0 हजार इतके होते. पाटबंधारे विभागाने तेच नुकसान २५ हजार रुपये इतके कमी केले. स्मशानभूमीच्या कामासाठी आणलेली सिमेंटची पोती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती.
ओढ्याच्या पाईपस व भरावही वाहून जाऊन सर्व मिळून ८ लाखांचे नुकसान झाले होते. तेच नुकसान पाटबंधारेच्या पाहणीत अवघे १ लाख ११ हजार इतके कमी दाखविण्यात आले आहे.
वनगळ व मालगाव या दोन्ही गावांतील सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार केला गेला आहे.
मालगावातील ४४ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असताना पाटबंधारे विभागाने पाहणी करून ते ११ लाख २ हजार ७०० रुपये एवढे कमी दाखवले. वनगळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजारांचे नुकसान झाले असताना ते केवळ १ लाख ६४ हजार इतके कमी दाखविण्यात आले आहे. यामुळे भरपाई मिळाली तरी त्यातून शेतकºयांचे समाधान होणार नाही.
हातात मात्र छदामही नाही...
गेल्या चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. लाखोंचे नुकसान हजारांत दाखविण्याचे सोपस्कार शासकीय यंत्रणेने करून ठेवले; परंतु एक छदामही शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही, हे विशेष! शासकीय यंत्रणा गेंड्याच्या कातडीची असल्याने न्याय मिळण्यासाठी झगडावे लागेल, असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी व्यक्त केले आहे.