आसऱ्यांसाठी गोशाळांची गरज
By Admin | Updated: March 17, 2015 00:06 IST2015-03-17T00:01:54+5:302015-03-17T00:06:33+5:30
गोवंश हत्याबंदी कायदा : जनावरे सामावण्याची पांजरपोळ संस्थेची क्षमता संपली

आसऱ्यांसाठी गोशाळांची गरज
संदीप खवळे -कोल्हापूर शाहू मिल परिसरातील श्री पांजरपोळ संस्थेची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. कोणतीही शासकीय मदत नाही, केवळ देणगीवरच ही संस्था चालत आहे. एखाद्दुसरा अपवाद वगळता भाकड गायींना आश्रय देणाऱ्या गोशाळा जिल्ह्यात नाहीत; त्यामुळे गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना भाकड गायींसाठी आता गावोगावी गोशाळाच सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी गो-बचाव चळवळीतील कार्यकर्त्यांकडून होत आहे.
भाकड जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे गाय किंवा म्हैस म्हातारे किंवा भाकड झाले की, त्यांना पांजरपोळचा रस्ता दाखविला जातो. म्हशीच्या तुलनेत कमी दूध आणि फॅट असल्यामुळे गायी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला. जर्सी गायींची संख्या वाढल्यामुळे देशी गायींना, वयोवृद्ध किंवा भाकड गायींना पांजरपोळ किंवा कत्तलखान्याकडे पाठविले जाऊ लागले; परंतु गायींच्या कत्तलींना विरोध होऊ लागला.
भाजप सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला. त्यामुळे जिल्ह्यातील भाकड आणि वयोवृद्ध गायींच्या देखभालीसाठी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. पांजरपोळ येथील शेडमध्ये पाचशे जनावरे मावतात. सध्या येथे चारशेच्यावर जनावरे आहेत. शिवाय येथे केवळ शेतकऱ्यांच्याच भाकड गायींना घेतले जाते. गायीबरोबरच म्हैस, बैलांनाही घेतले जाते. या जनावरांना लागणारा चारा, औषधोपचार, जनावरांची देखभाल करणारे कामगार यांसाठी प्रचंड खर्च होतो.
भाकड गायींव्यतिरिक्त शहरामध्येही अनेक भाकड व मोकाट गायी आहेत, त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे; पण काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील आबा कांबळे यांची गोशाळा आणि इचलकरंजी येथील गोशाळेचा अपवाद सोडला, तर जिल्ह्यात कुठेही भाकड गायींची देखभाल करण्याची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. आता गोहत्या बंदी कायदा झाल्यामुळे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची संख्या आपसूकच गोशाळांकडे वळणार आहे. या गोशाळांची जनावरे सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे कायदा झाला; आता गायींचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न शेतकरी आणि गोप्रेमींना पडला आहे.
गावागावांत गोशाळा व्हावी
गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाकड गायींना सांभाळण्याची स्वतंत्र यंत्रणाच उभारावी लागणार आहे. भाकड गायी सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे या गायींसाठी गावोगावी गोशाळाच उभारल्या पाहिजेत. सध्या आमच्याकडे शंभर गायी आहेत. गायींना चारा-पाणी देण्यासाठी येणारा खर्च आम्ही देणगीच्या माध्यमातून भागवत आहोत. गोसंवर्धनासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले पाहिजे.
- आबा कांबळे, गोशाळा चालक व सर्वोदय कार्यकर्ते