कोल्हापूर : जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा आधारस्तंभ असलेल्या ‘गोकुळ’ला सन २०२४-२५ मध्ये ११३ कोटी रुपयांचा नफा झाला. ‘गोकुळ’च्या इतिहासामध्ये प्रथमच इतका विक्रम नफा झाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.‘गोकुळ’च्या नियमित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुश्रीफ आणि पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सर्व संचालकांसह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी या विक्रमी नफ्याची माहिती नेत्यांना दिली. इतक्या स्पर्धेतही ‘गोकुळ’ने बाजारपेठेवरील आपली पकड कायम ठेवल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दूध उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याचा नेहमीच ‘गोकुळ’चा प्रयत्न राहिल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंदातील महत्त्वाच्या बाबी आणि दूध संकलनाबाबतची माहिती दिली.स्पर्धात्मक वातावरणात सर्व संचालकांनी काटकसरीने केलेल्या कारभारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण जादा दर देऊ शकलो, तसेच नफाही चांगला मिळाला. याच पद्धतीने कारभार करण्याच्या सूचना देऊन बैठकीच्या शेवटी पुन्हा एकदा मुश्रीफ, पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
Kolhapur: ‘गोकुळ’ला इतिहासात प्रथमच ११३ कोटींचा नफा; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:28 IST