गोकुळ निवडणूक : उमेदवारी अर्जासाठी पहिला दिवस विरोधकांचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 18:55 IST2021-03-25T18:52:41+5:302021-03-25T18:55:28+5:30
Gokul Milk Elecation Kolhapur- गोकुळसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस विरोधकांचाच राहिला. ७ जणांनी १२ अर्ज भरले. त्यातील ११ अर्ज हे विरोधी शाहू आघाडीचे आहेत, तर बाळासाहेब खाडे यांचा एकमेव अर्ज सत्ताधारी आघाडीकडून दाखल झाला. पहिल्याच दिवशी तीन विद्यमान आणि एका माजी संचालकाने उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली.

गोकुळ निवडणूक : उमेदवारी अर्जासाठी पहिला दिवस विरोधकांचाच
कोल्हापूर : गोकुळसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस विरोधकांचाच राहिला. ७ जणांनी १२ अर्ज भरले. त्यातील ११ अर्ज हे विरोधी शाहू आघाडीचे आहेत, तर बाळासाहेब खाडे यांचा एकमेव अर्ज सत्ताधारी आघाडीकडून दाखल झाला. पहिल्याच दिवशी तीन विद्यमान आणि एका माजी संचालकाने उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली.
येत्या २ मे रोजी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात गुरुवारपासून झाली. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेली खडाखडा पाहता शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी झ्रुंबड उडेल, अशी अटकळ बांधली जात होती, पण गुरुवारी दुपारपर्यंत दोन माजी अध्यक्षांसह विद्यमान संचालकांनीही अर्ज दाखल केल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीचा ज्वर वाढू लागल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील करवीर प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी तथा गोकुळ निवडणुकीसाठी नियुक्त झालेले निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे उमेदवारीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठीची मुदत होती. प्रतिज्ञापत्र, कागदपत्रासह अर्ज घेऊन तो भरण्यासाठीची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर तैनात केली होती, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वातावरणही बऱ्यापैकी निवडणूकमय दिसत होते.
माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आबाजी ऊर्फ विश्वास नारायण पाटील यांनी दोन गटातून चार अर्ज दाखल केले. सर्वसाधारण गट व इतर मागासवर्गीय गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना भगवान लोंढे, निवृत्ती पाटील, युवराज पाटील, युवराज भोगम हे सूचक होते, तर नामदेव पाटील, युवराज पाटील, निवृत्ती पाटील, भगवान लोंढे हे अनुमोदक राहिले. विशेष म्हणजे दरवेळी सत्तारूढकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आबाजी यावेळी पहिल्यांदाच विरोधी आघाडीकडून सर्वप्रथम अर्ज भरणारे ठरले.माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांनीही विरोधी शाहू आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे उमेदवारीवरून नरके घराण्यातील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. चुलते अरुण नरके हे सत्ताधारी आघाडीकडे आहेत, त्यांच्याकडून मुलगा चेतन की स्वत: अरुण नरके हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.गोकुळ संस्थापक घरातील जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर या विद्यमान संचालक आहेत. त्यांचा मुलगा शशिकांत चुयेकर यांनी विरोधी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुयेकरांची दुसरी पिढी गोकुळ रणांगणात सक्रिय झाली. पहिल्याच दिवशी सातजणांनी १२ अर्ज भरले. यात इतर मागासवर्गमधून दोन व सर्वसाधारण गटातून १० अर्जांचा समावेश आहे. इतर मागासवर्गाचे दोन्ही अर्ज विश्वास पाटील यांच्याच नावावर आहेत, तर सर्वसाधारणमधून अरुण डोंगळे, शशिकांत चुयेकर, अजित नरके, बाबासाहेब चौगुले, महाबळेश्वर चौगुले, बाळासाहेब खाडे यांनी अर्ज भरले. दाखल झालेल्या अर्जांपैकी राधानगरी, गडहिंग्लजचा अपवाद सोडला तर उर्वरित १० अर्ज हे एकट्या करवीर तालुक्यातील असल्याने करवीरचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.