Kolhapur Crime: दीड कोटीची गोवामेड दारू जप्त, पन्हाळा रोडवर सापळा रचून पकडला ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:37 IST2025-08-27T13:31:24+5:302025-08-27T13:37:52+5:30

दोघांना अटक, विभागीय भरारी पथकाची कारवाई

Goa made liquor worth 1 crore seized in Kolhapur, truck caught by setting a trap on Panhala Road | Kolhapur Crime: दीड कोटीची गोवामेड दारू जप्त, पन्हाळा रोडवर सापळा रचून पकडला ट्रक

Kolhapur Crime: दीड कोटीची गोवामेड दारू जप्त, पन्हाळा रोडवर सापळा रचून पकडला ट्रक

कोल्हापूर : आंबा घाटमार्गे एक कोटी ४७ लाख ८४ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू घेऊन आलेला ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पन्हाळा रोडवरील पडवळवाडीजवळ पकडला. सोमवारी (दि. २५) रात्री अकराच्या सुमारास सापळा रचून केलेल्या कारवाईत दारू आणि ट्रक असा एक कोटी ७७ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारे शैलेश जयवंत जाधव (वय ३६, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि वासुदेव केशवराज मुंढे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांना पथकाने अटक केली.

विभागीय कार्यालयाचे निरीक्षक किरण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा घाटमार्गे एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार भरारी पथकाने सोमवारी रात्री पन्हाळा रोडवर पडवळवाडीजवळ सापळा रचला.

संशयित ट्रक (एमएच. १२, व्हीटी. ७४०३) अडवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १४०० बॉक्स आढळले. एक कोटी ४७ लाख ८४ हजारांचा दारूसाठा जप्त करून ट्रकचालक शैलेश जाधव आणि त्याचा सहकारी वासुदेव मुंढे याला पथकाने अटक केली. या दोघांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

निरीक्षक पवार यांच्यासह दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, सहायक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, मारुती पोवार, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे यांच्या पथकाने कारवाई केली.

आंबा घाट ते जतपर्यंत जबाबदारी

अटकेतील जाधव आणि मुंढे यांच्याकडे दारूची वाहतूक करणारा ट्रक आंबा घाट ते कोल्हापूर, सांगली मार्गे जत येथे पोहोच करण्याची जबाबदारी होती. तिथून पुढे राज्याबाहेर पाठवण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तींकडे होती, अशी माहिती अटकेतील दोघांनी पथकाला दिली. हे दोघेही वाहन चालक म्हणून काम करतात.

व्हिस्कीच्या तब्बल ६७ हजार २०० बाटल्या

भरारी पथकाने पकडलेल्या ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या १८० मिलीच्या तब्बल ६७ हजार २०० बाटल्या सापडल्या. गेल्या वर्षभरातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. यावरून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Web Title: Goa made liquor worth 1 crore seized in Kolhapur, truck caught by setting a trap on Panhala Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.