साडेआठ कोटींचा जीएसटी चुकवला; गोव्यातील व्यावसायिकास अटक, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:06 IST2025-11-01T18:05:49+5:302025-11-01T18:06:07+5:30
बांधकाम साहित्य विक्रीच्या व्यवसायाद्वारे बनावट बिले तयार केली

साडेआठ कोटींचा जीएसटी चुकवला; गोव्यातील व्यावसायिकास अटक, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई
कोल्हापूर : बांधकाम साहित्य विक्रीच्या व्यवसायाद्वारे बनावट बिले तयार करून साडेआठ कोटींचा जीएसटी चुकवल्याबद्दल व्यावसायिक आर्थिक ललितकुमार जैन (वय २९, रा. वास्को, गोवा) याला केंद्रीय जीएसटी विभागाच्या विशेष गुप्तचर पथकाने अटक केली. शुक्रवारी त्याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. या गुन्ह्यातील त्याच्या अन्य साथीदारांचा केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून शोध सुरू आहे.
अटकेतील आर्थिक जैन याची मेसर्स आर्थिक जैन या नावाने गोव्यात फार्म आहे. या फर्ममार्फत स्टील, सिमेंट यासह बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य विकले जाते. त्याने गेल्या दीड ते दोन वर्षात विक्रीची ४० कोटींची बनावट बिले तयार करून साडेआठ कोटींचा जीएसटी चुकवल्याचे केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय जीएसटी विभागाच्या कोल्हापूर येथील वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी वास्को येथे आर्थिक जैन याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला होता. त्या कारवाईत त्याचा मोबाइल आणि काही कागदपत्रे जप्त केली होती. चुकवलेला कर भरण्यासाठी त्याला मुदत दिली होती. मात्र, मुदतीत कर न भरल्याने त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
त्याने स्वतःच्या फर्मसह आईच्या नावे असलेल्या फर्मची बनावट बिले सादर करून कर चुकवेगिर केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. न्यायालयीन कोठडी मिळतात त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शेखर टोणपे यांनी कामकाज पाहिले.
वरिष्ठ गुप्तचर अधिकारी सूरज पवार, अभिजीत भिसे यांच्यासह गुप्तचर अधिकारी सौरभ पवार, अविनाश सूर्यवंशी तसेच कर्मचारी संतोष माने, केतन आवळे, सचिन कांबळे आणि प्रवीण बागडी यांच्या पथकाने कारवाई केली.
साथीदारांचा शोध सुरू
गोव्यातील काही बांधकाम व्यवसायिकांना साहित्य विकल्याचे जैन याने कागदोपत्री दाखवले आहे. ज्या व्यवसायिकांच्या नावे बिले तयार केली त्यांची चौकशी केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे गोव्यातील अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्यात सहभाग आढळणाऱ्या सर्व व्यावसायिकांवर कारवाई करणार असल्याची माहिती जीएसटी अधिकाऱ्यांनी दिली.
आर्थिक जैन याने केलेल्या फसवणुकीमुळे आठ कोटींपेक्षा जास्त रकमेचे सरकारी महसुलाचे नुकसान झाले आहे. सीजीएसटी अधिनियमाच्या कलम १३२(१)(बी) आणि (सी) मधील तरतुदीनुसार अजामीनपात्र गुन्ह्याबद्दल त्याला अटक केली. जैन याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. - अभिजीत भिसे, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी