आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:05 IST2025-01-24T12:05:10+5:302025-01-24T12:05:28+5:30
व्हाईट आर्मीतर्फे आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मान

आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार
कोल्हापूर : आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा, अधिकारी व स्वंयसेवी संस्था उत्कृष्ट काम करतात याचा अनुभव वेळोवेळी आला आहे. त्यामुळे अशा काळात काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांना नागरिकांनी बळ दिले तर कोणत्याही संकटांचा आपण सहजपणे सामना करू शकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
कोल्हापुरातील व्हाईट आर्मी व शिवाजी विद्यापीठाच्या शिव-सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्यावतीने पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के, प्र कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, लातूर भूकंपावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी, काही स्वयंसेवी संस्थांनी उत्कृष्ट काम केले. आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा चांगले काम करते, असा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, भूज येथील भूकंपावेळी पवार यांनी महाराष्ट्र पॅटर्न वापरून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी शालेय अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा समावेश करावा. तसेच कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कोडोलीकर यांनी आभार मानले. यावेळी समरजित घाटगे, सरोज पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे, डॉ. एम.बी.शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार उपस्थित होते.
अन् आपत्ती व्यवस्थापन कायदा झाला
कच्छ, भूज भूकंपावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. यावेळी सर्वांनीच माझे नाव पुढे केल्याने या भूकंपावेळी मी आपत्ती व्यवस्थापनात पुढाकार घेतला. केंद्रात मंत्री असताना मी व तत्कालीन सचिव पी.के. मिश्रा कॅलिफोर्नियासह तीन-चार देशात गेलो, तेथील आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा पाहिल्या अन् त्यातूनच आपल्या देशात पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार झाल्याची आठवण पवार यांनी जागवली.