कोल्हापूर खंडपीठाबाबत थोडासा वेळ द्या, निश्चितच योग्य तो निर्णय होईल; मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:30 IST2025-03-29T13:30:13+5:302025-03-29T13:30:46+5:30
कोल्हापूर : आम्ही नुकतेच रुजू झालो आहोत. आपण ३५ वर्षे केलेल्या आंदोलनाच्या लढ्याची माहिती घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ...

कोल्हापूर खंडपीठाबाबत थोडासा वेळ द्या, निश्चितच योग्य तो निर्णय होईल; मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचे आश्वासन
कोल्हापूर : आम्ही नुकतेच रुजू झालो आहोत. आपण ३५ वर्षे केलेल्या आंदोलनाच्या लढ्याची माहिती घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच होण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. थोडासा वेळ द्या, निश्चितच सर्व कायदेशीर बाजू पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक ५५ मध्ये त्यांची भेट घेतली.
मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. चंदूरकर, एम. एस. सोनक, रेवती मोहिते-ढेरे पाटील, रविंद्र व्ही. घुगे यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने भेट घेतली.
बैठकीत खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत, ॲड संतोष शहा, ॲड. संग्राम देसाई यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध आहे. त्यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायमूर्ती यांच्या समोर माहितीचे सादरीकरण केले. कोल्हापुरातून मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटले, कोल्हापूरचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व, अन्य आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. कोल्हापूरपासून सहा जिल्ह्याचे अंतर आणि सर्किट बेंच स्थापन झाल्यास या जिल्ह्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले.
सुरुवातीला मुख्य न्यायमूर्ती आराधे यांनी केवळ पाच जणांचे शिष्टमंडळ भेटीसाठी यावे, असे सांगितले. त्यात निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत ॲड संतोष शहा, ॲड. संग्राम देसाई, वसंतराव भोसले आणि विवेक घाटगे यांचा समावेश होता. त्यानंतर समितीने विनंती केल्यानुसार सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील, सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी निशिकांत पाटोळे, रत्नागिरी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष निनाद शिंदे, सांगलीचे श्रीकांत जाधव, कराडचे संभाजी मोहिते सहभागी झाले.
अंबाबाईची मूर्ती, कोल्हापुरी फेटा देऊन सत्कार
दरम्यान शिष्टमंडळासोबत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव राजू ओतारी, लेखापरीक्षक कर्णकुमार पाटील, माजी अध्यक्ष ॲड. रणजीत गावडे, शिवाजीराव राणे ,राजेंद्र चव्हाण, प्रशांत शिंदे, अजित मोहिते, राजेंद्र मंडलिक, पिराजी भावके, सुनील गावडे, विजय महाजन, आर. आर. तोष्णीवाल, अमित सिंग आदी उपस्थित होते. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा श्री अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ आणि कोल्हापुरी फेटा देऊन निमंत्रक खोत यांनी सत्कार केला. प्रशासकीय न्यायमूर्ती यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान या विषयावरील पुस्तक भेट दिले. तसेच, मान्यवरांना कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण समितीने दिले. त्यांनी ही विनंती मान्य केल्याचे खोत यांनी सांगितले.