व्यवसाय कर वसुलीचा अधिकार ‘मनपा’ला द्या
By Admin | Updated: May 31, 2014 01:18 IST2014-05-31T00:50:42+5:302014-05-31T01:18:58+5:30
धनंजय महाडिक यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना भेटणार

व्यवसाय कर वसुलीचा अधिकार ‘मनपा’ला द्या
कोल्हापूर : ‘एलबीटी’ विरोधात गेली दोन वर्षे व्यापार्यांचे आंदोलन सुरू आहे. पैसे भरण्याबाबत व्यापार्यांचा नकार नाही, पण वसुलीच्या प्रणालीला विरोध आहे. यासाठी महापालिकेला ‘एलबीटी’ ऐवजी ‘व्यवसाय कर’ वसुलीचा अधिकार द्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात गोळा होणारा १ टक्का एलबीटी कर रद्द करून संपूर्ण राज्यासाठी खरेदी विक्री मुद्रांक शुल्कामध्ये २ टक्के वाढ करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महापालिका क्षेत्रात जकात रद्द करून एलबीटी कर राज्य शासनाने लागू केला आहे. त्याला व्यापार्यांचा विरोध आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शासनाने माजी आयएएस अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एलबीटी ला पर्यायी कर सुचवला आहे, पण यामध्ये महापालिकेचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहण्यासाठी योग्य पर्याय सुचविला गेला नाही. यासाठी राज्य शासनाने व्यवसाय कर वसुलीचा अधिकार महापालिकेला देणे गरजेचे आहे. सोमवारी (दि. २) महापालिकेचे नगरसेवकांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले