Girnar Parikrama: गिरनारची जंगल पायी परिक्रमा रद्द; भाविकांचा हिरमोड, महाराष्ट्रातून हजारो भाविक होतात सहभागी
By विश्वास पाटील | Updated: November 4, 2025 12:07 IST2025-11-04T12:06:47+5:302025-11-04T12:07:51+5:30
गेल्या काही वर्षांत प्रथमच ही यात्रा रद्द झाली आहे.

Girnar Parikrama: गिरनारची जंगल पायी परिक्रमा रद्द; भाविकांचा हिरमोड, महाराष्ट्रातून हजारो भाविक होतात सहभागी
विश्वास पाटील
कोल्हापूर : प्रचंड पावसामुळे गुजरातमधील गिरनार परिक्रमा मार्गांवरील रस्ते वाहून गेले आहेत, तर सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे देवस्थान समिती व स्थानिक प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षितेसाठी ही परिक्रमा रविवारी रद्द केली असून, प्रतीकात्मक परिक्रमा करण्याचे आवाहन केले आहे. 
पावसाचा फटका देवाच्या भक्तीलाही बसला आहे. ही जंगलातून पायी जाण्याची परिक्रमा फक्त प्रतिवर्षी नोव्हेंबरमध्येच असते. ती कार्तिक एकादशीपासून सुरू होते. त्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा परिक्रमा अचानक रद्द झाल्याने हिरमोड झाला. कोल्हापुरातूनही अनेक भाविक या परिक्रमेसाठी गेले आहेत. गेल्या काही वर्षांत प्रथमच ही यात्रा रद्द झाली आहे.
पंढरपूरला वारीसाठी प्रत्येक एकादशीला पांडुरंगाचे भक्त जातात, तसे या परिक्रमेलाही जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत. पायी दहा हजार पायऱ्या चढून एका मार्गाने भाविक नियमित जातात आणि जंगलातून पायी चालत जाणारी परिक्रमा फक्त कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत सात दिवसच सुरू असते. 
ही परिक्रमा अंदाजे ३६ किलोमीटर लांब आहे. ही परिक्रमा भवनाथ मंदिरापासून सुरू होते, जी सुंदर जंगल आणि विविध मंदिरांमधून जाते आणि दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने पूर्ण होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून हजारो भाविक सहभागी होतात. गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात असलेले हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. ज्यांना भक्तीसोबत ट्रेकिंग करायचे असते ते लोक या परिक्रमेला प्राधान्य देतात.
पावित्र्य काय..?
गिरनार पर्वताला दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या परिक्रमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
गिरनार परिक्रमेची दत्तभक्तांना वर्षातून एकदाच संधी असते. त्यासाठी वर्षभर तयारी केलेली असते. पण यावर्षी या तयारीवर निसर्गाने विरजण घातले आहे. या ठिकाणी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आले आहेत. भाविकांना जड अंतकरणाने पुढच्या वर्षी येण्याचा मनोमनी संकल्प करून शिखर दर्शन करून परत जावे लागत आहे. - मोहन खोत, हुपरी, ता. हातकणंगले
कोल्हापूरसह नृसिंहवाडी व पश्चिम महाराष्ट्रातून या परिक्रमेसाठी जाणाऱ्या दत्तभक्तांची संख्या मोठी आहे. परंतु परिक्रमा रद्द झाल्याने हे सर्व भाविक अन्य धार्मिक स्थळांना भेटी देऊन परतू लागले आहेत. - अनिल चव्हाण, कोल्हापूर