गूळ उत्पादकांना जीआयचा होणार फायदा: फसवणुकीला लागणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:30 IST2020-10-28T16:27:32+5:302020-10-28T16:30:35+5:30
Agriculture Sector, marketyard, kolhapurnews कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता या मानांकनाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना जीआय नोंदणीसह प्रशिक्षणासाठी पणन अनुदान मिळणार असून, गुळात होणारी भेसळ व फसवणुकीलाही चाप बसणार आहे.

गूळ उत्पादकांना जीआयचा होणार फायदा: फसवणुकीला लागणार चाप
कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता या मानांकनाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना जीआय नोंदणीसह प्रशिक्षणासाठी पणन अनुदान मिळणार असून, गुळात होणारी भेसळ व फसवणुकीलाही चाप बसणार आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला गुळासाठी कोल्हापूर गूळ म्हणून चार वर्षांपूर्वी मानांकन मिळाले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने कर्नाटक, सांगली येथील गुळाची कोल्हापूरी गूळ या नावाने विक्री होते. त्यामुळे येथील गुळाचा दर घसरत होता.
भेसळ होत असल्याने कोल्हापुरी गुळाची बदनामी होते. यासाठी पणन मंडळाने आता मानांकन प्राप्त शेती उत्पादनाच्या मार्केटिंगकडे लक्ष केंद्रित केले आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी ह्यपणनह्णकडे नोंदणी केल्यानंतर संबंधितांचे प्रशिक्षण घेतले जाते. त्याचबरोबर शेतीमाल विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देणे व त्यासाठी अनुदानही दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेतीमालाच्या ब्रँडिंगसाठी ह्यपणनह्ण पुढाकार घेणार आहे.
नोंदणी, प्रशिक्षण, मार्केटिंगपर्यंत येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कमही अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही योजना बाजार समिती व पणन मंडळ हे संयुक्तपणे राबवणार असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन पणन मंडळाचे कोल्हापूर विभागीय उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले आहे.