Kolhapur: गारगोटी विश्रामगृह जागा परत मिळवणे दिव्यच, खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:08 IST2025-01-24T18:08:05+5:302025-01-24T18:08:22+5:30

सयाजी देसाई यांनी खरेदी केली जमीन

Getting back the Gargoti Rest House land is a Hard, the purchase and sale transaction is complete | Kolhapur: गारगोटी विश्रामगृह जागा परत मिळवणे दिव्यच, खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण 

Kolhapur: गारगोटी विश्रामगृह जागा परत मिळवणे दिव्यच, खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण 

शिवाजी सावंत

गारगोटी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि राज्य शासनाच्या मालकीच्या विश्रामधामगृहाच्या जागेची विक्री पूर्ण कायदेशीर बाबी सांभाळून झाली आहे. त्यामुळे ही जागा परत मिळविणे म्हणजे एक दिव्यच आहे. चर्चेतून मार्ग निघणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे हा विभाग चर्चेने प्रश्न सोडविणार की न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार हे येणाऱ्या काळात समजेल. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच पुढाकार घेऊन ही सार्वजनिक मालमत्ता कशी सार्वजनिकच राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे. गावातीलच सयाजी देसाई यांनी ही जमीन मूळ मालक हिंदुराव सावंत यांच्याकडून खरेदी केली आहे.

या खरेदी व्यवहाराने तालुक्यातील अनेक शासकीय इमारती बांधल्या असलेल्या जागांचा सातबारा तपासणे गरजेचे झाले आहे. भविष्यात एखादा दवाखाना अथवा शाळा विकली गेल्यास नवल वाटणार नाही. कारण ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची जागा वर्षानुवर्षे त्यांच्या नावावर नसताना बिनधास्त असलेले कार्यालयाच्या निगराणीमध्ये उभारल्या गेलेल्या इमारती तरी संबंधित खात्याच्या नावावर असतील का? तालुक्यातील अनेक इमारतींचा सातबारा अजूनही खासगी भोगवटादारांच्या नावावर असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. 

१९८५ पासून ७/१२ पत्रकी पीक पाहणी सदरात पाच गुंठे विश्रामधाम इमारतीची नोंद आहे. तेंव्हापासून आजतागायत या विभागाने कोणतीही हालचाल केली नाही, त्यामुळे ही जमीन मूळ मालकाने विकली. या विभागाच्या गलथान कारभारामुळे खासगी जमिनीवर शासनानेच अतिक्रमण केले असा प्रश्न उपस्थित होतो. (उत्तरार्ध)

  • गट क्रमांक ५२६/अ मधील २६ गुंठ्याची खरेदीचा १९ डिसेंबर २०२४ ला खरेदी दस्त नोंदणी झाला. त्याची शासनाच्या रेडिरेकनर प्रमाणे ४० लाख रुपये किंमत केली गेली. या जागेचा सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग १ आहे. त्यावर इतर कोणताही निर्बंध अथवा इतर कोणतीही नोंद नसल्याने खरेदी निर्धोक झाली. दस्तुरखुद्द उपनिबंधक कार्यालयाला याची कल्पना आली नाही.
  • जागामालक हिंदुराव सावंत म्हणाले, पूर्वी जागा दिली त्यावेळी पुनर्वसन म्हणून आमच्या घरातील दोन व्यक्तींना शासकीय सेवेत नोकरी देण्याची हमी दिली होती. त्यांनी शब्द न पाळल्याने आम्ही बांधकाम पाडले होते. हे संपूर्ण गारगोटी शहराला माहीत आहे. त्यावेळी तत्कालीन नेते आणि अधिकाऱ्यांनी नोकरीची हमी दिली. पण त्यानंतर कोणीही शब्द पाळला नाही.
  • खरेदीदार सयाजी देसाई म्हणाले, खरेदी केलेली जमीन ही पूर्णतः खासगी मालकीची असल्याचे कागदपत्रांवरून सिद्ध होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विश्रामधाम इमारतीसाठी जमीन प्रदान केल्याचा उच्चपदस्थ अधिकारी यांचा कोणताही आदेश किंवा सबळ पुरावा नाही. तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून या विभागाने जागेसंदर्भात संपादन प्रस्ताव पाठवला तर जरूर विचार करू.

या खरेदी व्यवहाराबाबत बांधकाम विभागाने अपिलीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. - अर्चना पाटील तहसीलदार, भुदरगड
 

वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. आम्ही कागदपत्रे तपासून घेत असून प्रसंगी वरिष्ठांनी आदेश दिल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. - एस. बी. इंगवले प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भुदरगड

Web Title: Getting back the Gargoti Rest House land is a Hard, the purchase and sale transaction is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.