पक्ष, राजकारण बघू नका; ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, ग्रामविकासमंत्र्यांचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:53 IST2025-09-16T17:53:00+5:302025-09-16T17:53:29+5:30
पंतप्रधानांच्या घरी चहाला जायचे आहे

पक्ष, राजकारण बघू नका; ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, ग्रामविकासमंत्र्यांचे भावनिक आवाहन
कोल्हापूर : जिल्हा परिषदेला पाच कोटी रुपयांची बक्षीस देणारी आणि हजारो गावांना कोट्यवधी रुपये देणारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही पहिली योजना आहे. त्यामुळे आता पक्ष, राजकारण काही बघू नका. ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांनी केले.
येथील ‘आनंद भवन’ येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेला खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, ‘यशदा’चे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर आयुक्त नितीन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते. अर्ध्या तासाच्या भाषणात गोरे यांनी चौफेर उदाहरणे देत सरपंच आणि ग्रामसेवकांना या अभियानामध्ये सक्रिय सहभागासाठी उद्युक्त केले.
मंत्री गोरे म्हणाले, या शाहूनगरीने देशाला आणि राज्याला दिशा देणाऱ्या योजना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू होत आहे. सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या जेवढ्या योजना सुरू आहेत, त्याची जरी प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तरी गावे समृद्ध व्हायला काहीच वेळ लागणार नाही. सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केली की या अभियानातील ६५ टक्के काम होणार आहे आणि केलेले काम नोंदवले की उरलेले काम पूर्ण होणार आहे.
खासदार महाडिक म्हणाले, ही योजना म्हणजे ‘रिव्होल्युशन’ असली तरी त्यासाठी ‘सेल्फ इव्होल्युशन’ म्हणजे आपलेच मूल्यमापन करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावे बदलत आहेत. केरळप्रमाणे आपलीही खेडी बदलली पाहिजेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, हे अभियान म्हणजे क्रांती असून, हा २७ पानांचा ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन आदेशाचा अभ्यास केला आणि त्यानुसार गावचा कारभार केला तर गावे बाइकच्या नव्हे तर रॉकेटप्रमाणे प्रगती करतील. यावेळी सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी आभार मानले.
पंतप्रधानांच्या घरी चहाला जायचे आहे
या अभियानातील पहिले तीन सरपंच, तीन गटविकास अधिकारी, तीन सीईओ यांना आपल्या घरी दहा मिनिटे चहापानासाठी बोलवावे, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे. ते नकार देणार नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्याला भेटायला जायचे आहे या जिद्दीने कामाला सुरूवात करा, असेही गोरे म्हणाले.