Ganpati Festival -गौराई आली माहेराला... घरोघरी गौरीची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:16 IST2020-08-26T14:14:29+5:302020-08-26T14:16:34+5:30
सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला... गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला, भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली... पानाफुलांनी बहरली... अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन झाले. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Ganpati Festival -गौराई आली माहेराला... घरोघरी गौरीची प्रतिष्ठापना
कोल्हापूर : सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला... गवर आली माहेराला भाजी-भाकर जेवायला, भाजी भाकर जेवली, रानोमाळ हिंडली... पानाफुलांनी बहरली... अशा या पानाफुलांनी बहरलेल्या गौराईचे मंगळवारी घरोघरी आगमन झाले. लेक गणपतीच्या शेजारी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणपती बाप्पांचे आगमन झाले की पाठोपाठ आई गौराईदेखील माहेरपणाला म्हणून भक्तांच्या घरी येते. दोन दिवस राहून पती शंकरोबासोबत पुन्हा आपल्या कैलासावर परततात. या परिवारदैवतांच्या पूजेअर्चेने घराघरांतील वातावरण मांगल्याने भारून जाते.
यंदा गणपती बाप्पांच्या नंतर तीन दिवसांनी गौराईचे आगमन झाले. दारात छान रांगोळी सजली. गणपतीशेजारी देवीसाठीही आरास सजली. याप्रसंगी घराघरांतील सुवासिनी महिला व कुमारिका पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन तेथे कळशीत गौराईचे डहाळे पूजतात. तेथे गौराईच्या गीतांवर फेर धरून गौरीगीते गात या पारंपरिक सणाचा आनंद लुटला जातो.
यंदा सगळीकडे कोरोनाचे संकट असले तरी महिलांनी सणाच्या उत्साहात कुठेही कमतरता ठेवली नाही. आपल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत महिलांनी पंचगंगा नदीघाट, रंकाळा अशा जलाशयांच्या ठिकाणी गर्दी केली होती. नऊवारी साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजऱ्याचा नखरा, नथ, गळ्यात हार, मंगळसूत्र असा पारंपरिक साजश्रृंगार करून महिलांनी गौरीच्या डहाळ्यांचे पूजन केले.
पूजनानंतर घरात पाऊल ठेवताना गौरी आली, काय काय लेवून आली, काय घेऊन आली... अशा प्रश्नांना उत्तर देत तिच्या आगमनाने सुख-समृद्धी आल्याचे सांगत गणपतीशेजारी गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रानावनांत वाढलेल्या गौराईला मिश्र भाजी, भाकरी, वडीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
गौरीच्या खेळांची हौस
यंदा सर्वत्र कोरोना असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र गौरी-गणपतीत महिलांनी गौरीगीतांवर खेळ नाही खेळले तर सणाचा आनंद पूर्ण होत नाही. त्यात मंगळवारी पावसाचे उघडीप दिली. त्यामुळे रात्री महिलांनी मास्क घालून गौरीगीतांचे खेळ खेळले.