Kolhapur: राधानगरीतील पिलारवाडीत गव्याचा धुडगूस; म्हशीवर हल्ला, तिघे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:01 IST2025-11-08T16:59:44+5:302025-11-08T17:01:34+5:30
ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला

Kolhapur: राधानगरीतील पिलारवाडीत गव्याचा धुडगूस; म्हशीवर हल्ला, तिघे बचावले
धामोड : पिलारवाडी (ता राधानगरी ) येथील ट्रकाचा भांग नावाच्या शिवारात गव्याने धुडगूस घातला. यावेळी एका म्हशीवर जोरदार हल्ला चढवला. यात म्हैश गंभीर जखमी झाली. दरम्यान, एक महिला व दोन पुरुष सुखरूप बचावले. काल, शुक्रवारी (दि.७) ही घटना घडली.
हा गवा पिसाळल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण गव्याने शेताकडे निघालेल्या गावातील श्रीपती कृष्णा डवर, श्रीपती रामचंद्र पिलावरे, व गौरा धनाजी पिलावरे याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर म्हणूनच ते बचावले.
दरम्यान शिवारात जणावरे चारण्यासाठी गेलेल्या शामराव आण्णाप्पा डकरे यांच्या म्हशीवर गव्याने हल्ला चढवला. गव्याने म्हैशीच्या पोटात शिंगे खुपसल्याने म्हैश जखमी झाली. ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
शाळकरी मुलांच्या जिवास धोका
पिलावरवाडी येथून जवळपास २५ शाळकरी मुले केळोशी बु॥ व धामोड या गावी या मार्गावरून जात असतात. गव्यांच्या बंदोबस्तासाठी काही उपाय न केल्यास मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वन विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे.