उंदरवाडीत कालव्यात पडला गवा; सुदैवाने पाण्याबाहेर पडल्याने वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:32 IST2023-04-28T17:32:06+5:302023-04-28T17:32:17+5:30
यापुर्वीही या ठिकाणी अनेकवेळा गव्यांचा कळप पाण्यात पडल्याच्या आणि गवा मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या

उंदरवाडीत कालव्यात पडला गवा; सुदैवाने पाण्याबाहेर पडल्याने वाचला जीव
रमेश वारके
बोरवडे: काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात गवा पडल्याची घटना कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच्या हद्दीत घडली. सध्या या कालव्याला पाणी असल्याने हा गवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होता. परंतु सुदैवाने बेलजाई मंदिराजवळील लोखंडी पुला जवळून या गव्याला पाण्याबाहेर पडण्यासाठी जागा मिळाल्याने तो बाहेर पडून डोंगराकडे निघून गेला.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, उंदरवाडी गावच्या हद्दीत सकाळी शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यात पडलेला गवा दिसला. सध्या कालव्याला पाणी सोडल्याने, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा गवा वाहत जात होता. ज्ञानदेव फासके, एन.के. जाधव, संभाजी पाटील, विठ्ठल पाटील आदी नागरिकांनी या गव्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला काठावरुन हुसकावण्याचा प्रयत्न केला.
गव्याने पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतू कालव्याचे अस्तरीकरण केल्याने गव्याचे पाय निसटत होते. हा गवा पोहत अस्तरीकरण न केलेल्या ठिकाणाहून पाण्याबाहेर पडून डोंगर भागाकडे निघून गेला. यापुर्वीही या ठिकाणी अनेकवेळा गव्यांचा कळप पाण्यात पडल्याच्या आणि गवा मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथे गव्यांसाठी रँम्पची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.