चावरेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर उध्वस्त: दीड लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:42 IST2020-03-24T14:40:37+5:302020-03-24T14:42:03+5:30
चावरे (ता. हातकणंगले) येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

चावरे (ता. हातकणंगले) येथील सागर पोपट घोडके यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर उध्वस्त झाले.उध्वस्त घर व आगीत भस्मसात झालेल्या वस्तु व प्रापंचिक साहित्य. (छाया: दिलीप चरणे)
नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले) येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ; चावरे येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांचे भाऊबंदासह कौलारू घर आहे.घरी पत्नी, मुलगा सागर, सून व नातवंडासह ते राहतात.आज मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घरातील सिलेंडर संपले म्हणून दुसरे सिलेंडर जोडले.गॅस प्रवाह सुरू केला असता निपल मधून जोरात गॅस गळती सुरू झाली. सागर पोपट घोडके यांनी प्रसंगावधान राखून घरातील सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर घरात तात्काळ आग भडकली. घरातील फ्रिज, टीव्ही, मिक्सर, तिजोरी अंथरूण - पांघरूण व भांडी जळून खाक झाली. या घटनेत दीड लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज सागर घोडके यांनी व्यक्त केला आहे. सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की घराच्या चारही खोल्यांचे छत उध्वस्त झाले. सर्व भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नंदकुमार आनंद घोडके व शंकर आनंदा घोडके यांच्या स्वयंपाक घराचे छताची पडझड होऊन त्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत.
या घटनेची फिर्याद सागर पोपट घोडके यांनी वडगाव पोलिसात दिली आहे. गॅसच्या निपल मधून गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती पोपट घोडके यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे घोडके कुटुंबीय हाताश झाले आहेत.
जीवित हानीचा अनर्थ टळला
नवीन सिलेंडर गॅस शेगडीला जोडत असताना निपल मधून वेगाने गॅस गळती सुरू झाली. प्रसंगावधान लक्षात घेऊन सागर घोडके यांनी घरातील सर्वांना घराबाहेर काढले. कुटुंबीय घराबाहेर पडताच सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन आग भडकली. सागर यांच्या प्रसंगावधाना मुळे जीवितहानी चा अनर्थ टळला.