दरोडेखोरांची टोळी गजाआड
By Admin | Updated: July 9, 2014 01:00 IST2014-07-09T00:55:24+5:302014-07-09T01:00:53+5:30
सोमवारी रात्री अटक

दरोडेखोरांची टोळी गजाआड
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात लूटमार, चेन स्नॅचिंग, चोरी आणि दरोडा टाकणाऱ्या पाच अट्टल दरोडेखोरांना जुना राजवाडा पोलिसांनी काल, सोमवारी रात्री अटक केली. या सर्वांना आज, मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यांचा मुख्य म्होरक्या संशयित प्रशांत महालिंग सनदी हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, हॉकी स्टेडियम परिसरात काल दुपारी दोनच्या सुमारास नंबर नसलेल्या मोटारसायकलवरून दोन तरुण तोंडाला स्कार्प बांधून सुसाट वेगाने चालले होते. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड यांना पेट्रोलिंग करताना त्या दोघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे रोहित केसरकर व सागर माने सांगून मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी आणखी काही साथीदारांच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात लूटमार, चेन स्नॅचिंग, चोऱ्या, दरोडे टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सलमान मुकादम व आशिष गायकवाड यांना अटक केली. या टोळीचा म्होरक्या प्रशांत सनदी हा फरारी आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो मिळाल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या संशयितांनी २०१३ मध्ये हनुमान नगर पाचगाव येथे मोटारसायकलवरून घरी निघालेल्या बाबूराव कृष्णात यादव (रा. कोगे) यांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती. त्यानंतर त्यांनी मंगेशकर नगर येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)