Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरातील मिरवणुकीत युवती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 16:32 IST2018-09-23T15:40:08+5:302018-09-23T16:32:14+5:30
गणेशोत्सवात कोल्हापूरने एक वेगळी परंपरा जोपासली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी युवती, महिला उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला.

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरातील मिरवणुकीत युवती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : गणेशोत्सवात कोल्हापूरने एक वेगळी परंपरा जोपासली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत रविवारी युवती, महिला उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला. त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळत उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला.
खासबाग मैदान येथून सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यापूर्वीच विसर्जन मार्गावर मंडळांचे आगमन झाले होते. शहरासह उपनगरातील विविध मंडळांच्या माध्यमातून या महिला, युवती मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या. त्यातील काही युवती, महिलांनी कोल्हापुरी फेटा बांधला, काहींनी भगव्या, लाल अशा एका रंगाच्या, तर काहींनी नऊवारी साडी नेसली होती. काहींनी हातात भगवा ध्वज घेतला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करत त्यांचा जल्लोष सुरू होता. काही महिलांनी फुगडीचे फेर धरत, लेझीम खेळून मिरवणुकीमध्ये रंग भरला.
‘बाप्पा’समवेत सेल्फी
या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या युवती, महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मिरवणूक मार्गावर अनेक युवती, महिलांनी ‘बाप्पां’च्या मूर्तीसमवेत सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला.
ढोलवादन पथकात सहभाग
मिरवणुकीतील विविध ढोलपथकांमध्ये युवतींचा सहभाग लक्षणीय होता. पांढरा कुर्ता, भगवे जाकीट आणि कोल्हापुरी फेटा असा पेहराव केलेल्या युवती मोठ्या उत्साहाने ढोलवादन करीत होत्या.