गणेश मूर्तिकारांना व्यवसायाची परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 13:48 IST2020-04-24T13:46:41+5:302020-04-24T13:48:16+5:30
गतवर्षी महापुरामुळे कुंभार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सगळ्यांवर बँकेचे कर्ज आहे. यंदा अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिस उपलब्ध झालेले नसल्याने समाजावर संकट ओढवले आहे. राज्य शासनाने २० एप्रिलपासून बाजारपेठेतील दळणवळण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरात कुंभार समाजाला गणेशमूर्ती व्यवसायासाठी परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन गुरुवारी पालकमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले.
कोल्हापूर : यंदा गणेशोत्सव आॅगस्ट महिन्यात असल्याने गणेश मूर्तिकारांना शाडू माती व प्लास्टर आॅफ पॅरिस उपलब्ध करून द्यावे; तसेच हा व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीने केली आहे. गुरुवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व राज्यांनी सीमा बंद केल्याने वाहतूक बंद आहे. कुंभार समाजातर्फे शाडूपासून इको-फ्रेंडली व प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवल्या जातात. कोल्हापूर शहरात दीड हजारांवर कुटुंबे हा व्यवसाय करतात. यंदा गणेशोत्सव २२ आॅगस्टपासून सुरू होत आहे. उन्हाळ्यात गणेशमूर्ती चांगल्या वाळतात; त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात या मूर्ती बनविल्या जातात. कोल्हापूरला गुजरात व राजस्थानमधून या साहित्याचा पुरवठा होतो. सध्या वाहतूक बंद असल्याने गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नाही.
गतवर्षी महापुरामुळे कुंभार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सगळ्यांवर बँकेचे कर्ज आहे. यंदा अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिस उपलब्ध झालेले नसल्याने समाजावर संकट ओढवले आहे. राज्य शासनाने २० एप्रिलपासून बाजारपेठेतील दळणवळण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शाडू माती व प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. कुंभार समाज शाहूपुरी, गंगावेश, पापाची तिकटी, धोत्री गल्ली, दत्त गल्ली येथे राहत असून त्यांचा व्यवसाय बापट कॅम्प येथे आहे. तरी तेथे नागरिकांना ये-जा करण्याची परवानगी मिळावी. यावेळी उदय कुंभार, विजय पुरेकर, अमोल माजगांवकर, कमलाकर आरेकर उपस्थित होते.