शहरात गणेश जयंती उत्साहात, मंदिर परिसरात आकर्षक सजावट, धार्मिक विधी : प्रसादाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 18:13 IST2021-02-15T18:10:26+5:302021-02-15T18:13:00+5:30
Ganesh Jayanti Kolhapur- कोल्हापूर शहरात सोमवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजविलेला पाळणा जोजवत लाडक्या बालगणेशाचा जन्मकाळ सोहळ्याला शहरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश जयंती सोहळा साधेपणाने साजरा करत महाप्रसाद सोहळा रद्द केला, असे असले तरी होमहवन, अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले. प्रसादाचे वाटपही झाले.

कोल्हापुरातील ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : शहरात सोमवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजविलेला पाळणा जोजवत लाडक्या बालगणेशाचा जन्मकाळ सोहळ्याला शहरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश जयंती सोहळा साधेपणाने साजरा करत महाप्रसाद सोहळा रद्द केला, असे असले तरी होमहवन, अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले. प्रसादाचे वाटपही झाले.
गेल्या चार दिवसांपासून शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंतीची जय्यत तयारी सुरू होती. परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी झाल्यानंतर मंडप उभारणी, आकर्षक सजावट, रंगबिरंगी फुले, रांगोळ्यांची आरास आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईने मंदी परिसर उजळून निघाला होता.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने ओढ्यावरील सिद्धीविनायक गणेश मंदिरात जन्मकाळ सोहळा झाला. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
शहर गणेशमय
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गारेचा गणेश, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई पार्कमधील पितळी गणेश, हरिओमनगर येथील वरद विनायक मंदिर, राजारामपुरी शाहू वसाहत येथील २१ फुटी गणेश, कळंबा तलाव परिसर, रेसकोर्स गणेश मंदिर, रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा बालगणेश मंदिर, आर. के. नगर येथील खडीचा गणपती, टिंबर मार्केट येथील गणेश मंदिर, गंगावेश रिक्षा स्टॉप येथील गणेश मंदिर, रंकाळा डी मार्टसमोरील गणेश मंदिर यासह शहरातील विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा केला.
आंब्यातील गणेश मंदिरात प्रसाद वाटप
आंबा, मानोली (ता.शाहूवाडी) येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त सकाळी १२.१७ वाजता जन्मसोहळा झाला. महाप्रसाद वाटप रद्द करून शिराचा प्रसाद वाटप करण्यात आले. विश्वस्त बिनखांबी गणेश रिक्षा मित्र मंडळाच्यावतीने कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३४ वर्षांनी प्रथमच साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला.