कोल्हापूर : मैदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, टक्केवारीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, महापालिकेचा एल्गार, पाच कोटी उधळणार, अशा घोषणा देत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गांधी मैदानात साचलेल्या पाण्यात खोट्या नोटा उधळून प्रतिकात्मक आंदोलन केले.मान्सूनपूर्व पावसामुळे पाणी साचून राहिल्याने गांधी मैदानाची दुरवस्था झाली आहे, त्यावर खेळाडूंना खेळता येत नाही अशी स्थिती झाली आहे. याविषयी उध्दवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. सेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनिल मोदी, महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, जाहिदा खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी गांधी मैदानात मंगळवारी साचलेल्या पाण्यात खोट्या नोटा उधळून प्रतिकात्मक आंदोलन केले.गेल्या पंचवीस वर्षामध्ये गांधी मैदानात फक्त वळवाचा पाऊस आल्यानंतरच पाणी साचत होते, आणि तेही फक्त दोन दिवसात पाणी पुर्णपणे वाहुन जायचे. पण गेल्या दहा वर्षात या मैदानावर दहा ते बारा दिवस पाणी साचून राहू लागले, हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्याचे उध्दवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी पाच कोटी रुपये निधी आणला, पण तो कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाची दुरवस्था का? मैदानात पाणी साचू नये म्हणुन फंड आला असेल तर मैदान अजुनही पाण्यातच का असा सवाल त्यांनी केला. हा पाच कोटी निधी कुठे गेला याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केल्याचे इंगवले यांनी सांगितले. यावेळी धनाजी दळवी, दीपक गौड, रवि चौगुले, राजेंद्र जाधव, दिपाली शिंदे, सागर साळोखे, शशी बिडकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महापालिकेचे मुख्य आराेग्य अधिकारी विजय पाटील, आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे आणि अक्षय आटकर उपस्थित होते.
कोल्हापुरातील गांधी मैदानात साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक आंदोलन, खोट्या नोटा उधळल्या
By संदीप आडनाईक | Updated: May 20, 2025 15:25 IST