आॅक्सिजन निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:16 IST2021-04-13T19:09:22+5:302021-04-13T19:16:12+5:30
CoronaVirus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लजच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रूग्णालयातील आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प राज्यभर चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे गडहिंग्लजचे उपजिल्हा रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले.

गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेला आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प. (मज्जीद किल्लेदार)
राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रूग्णालयातील आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प राज्यभर चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे गडहिंग्लजचे उपजिल्हा रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले.
परंतु, आॅगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्सिजन सिलेंडरचा प्रचंड तुटवडा होता. त्यामुळे दिवसातून दोन-तीन फेऱ्या करून कोल्हापूर, शिरोली, यड्राव व कागल येथून आॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध करताना प्रशासनाची दमछाक व्हायची. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळातर्फे सुमारे ८० लाख रूपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
चेन्नई येथील आॅक्सएअर या कंपनीने हा प्रकल्प उभारला आहे. याठिकाणी हवेतील आॅक्सिजन संकलित केले जाते. त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय आॅक्साईड बाजूला करून जम्बो सिलेंडरमध्ये आॅक्सिजन भरून ठेवले जातात. प्रतिदिनी १२० ते १५० जम्बो सिलेंडर आॅक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. यासाठी वीज बिलाव्यतिरिक्त कोणताही खर्च नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच, गडहिंग्लजच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभर असे प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे.
दृष्टीक्षेपात प्रकल्प.
- चेन्नई येथील आॅक्सएअर कंपनीतर्फे उभारण्यात आलेला हवेतील आॅक्सिजन संकलित करणारा प्रकल्प.
- बांधकामासह एकूण खर्च ८० लाख.
- प्रतिदिनी क्षमता १२० ते १५० जम्बो सिलेंडरची आॅक्सिजन निर्मिती.
- वीज बिलाव्यतिरिक्त अन्य कोणताही खर्च नाही.
६० बेडस्ना आॅक्सिजन पुरवठा
उपजिल्हा रूग्णालयातील ६० बेडस्पर्यंत मध्यवर्ती लाईनद्वारे आॅक्सिजन उपलब्ध करण्यात आले आहे. रूग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जातो.
आॅक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी उभारण्यात आलेला हा प्रकल्प फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवर्जून या प्रकल्पाची माहिती घेतली आहे.
- डॉ. दिलीप आंबोळे,
वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज.