यंत्रमागांचे ‘रॅपिअर’मध्ये रूपांतरासाठी अनुदान
By Admin | Updated: September 7, 2014 23:24 IST2014-09-07T20:36:50+5:302014-09-07T23:24:41+5:30
प्रकाश आवाडे : केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग समितीचा निर्णय; ५५ हजारांचे अनुदान मिळणार

यंत्रमागांचे ‘रॅपिअर’मध्ये रूपांतरासाठी अनुदान
इचलकरंजी : साध्या यंत्रमागाचे रॅपिअर मागामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रतिमागास ३५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग तज्ज्ञ समितीने घेतला आहे. त्यामध्ये राज्य शासनाचे २० हजार रुपये असे एकूण ५५ हजार रुपये अनुदान मिळेल, अशी ग्वाही माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.
साध्या यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाची मंजूर पत्रे येथील इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यंत्रमागधारकांना वितरित करण्यात आली. त्यावेळी माजी मंत्री आवाडे बोलत होते. ते म्हणाले, यंत्रमागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारचे १५ हजार रुपये व त्यापाठोपाठ मिळणारे राज्य शासनाचे १० हजार रुपये असे एकूण २५ हजार रुपये अनुदान देण्याची मंजुरी शहरातील ३०८ यंत्रमागधारकांना मिळाली आहे. त्याची मंजुरीपत्रे शनिवारी येथे वितरित केली जात आहेत. प्रारंभी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी, इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना आधुनिकीकरणासाठी ६ कोटी १५ लाख रुपये आता मंजूर झाले असून, उर्वरित यंत्रमागांसाठी अनुदान निधी मिळण्याचा असोसिएशनचा जोरदार प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. यावेळी सुनील पाटील, चंद्रकांत पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमासाठी ‘पीडीएक्सएल’चे अध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, प्रकाशराव सातपुते, प्रकाश मोरे, अशोकराव आरगे, तुकाराम पाटील, पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे, सर्व संचालक व यंत्रमागधारक उपस्थित होते.