कोल्हापूर: आजऱ्यात टस्करचा धुडगूस, शेडसह तीन गाड्या केल्या पलटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:48 IST2022-07-15T12:45:52+5:302022-07-15T12:48:07+5:30
रात्री टस्कर बिथरल्याने मोठ्याने चित्कारत होता त्यामुळे नागरिक भयभीत झाले

कोल्हापूर: आजऱ्यात टस्करचा धुडगूस, शेडसह तीन गाड्या केल्या पलटी
सदाशिव मोरे
आजरा : आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्करचा वावर वाढला आहे. टस्करमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. काही दिवसापुर्वीच शेतीच्या नुकसानीबरोबरच टस्करकडून गाड्या पलटी केल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर काल, गुरुवारी गवसे (ता.आजरा) येथे रात्रीच्या सुमारास टस्करने पुन्हा धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचे नुकसान केले.
गवसे येथे रेमित फर्नांडिस यांची एक चार चाकी व दोन दुचाकी गाड्या पलटी करून नुकसान केले आहे. टेक नावाच्या शेतात रात्री अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत गाड्यांच्या नुकसानी बरोबर ऊस व भात पिकातही धुडगूस घातला आहे. काही काळ टस्कर आजरा आंबोली रस्त्यावरही ठाण मांडून उभा होता. कोकण गोव्यासह पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना टस्करचे दर्शन झाले.
टस्कराने रेमित फर्नांडिस यांच्या संरक्षक भिंतीतून प्रवेश करून प्रथम गाड्यांचे शेड पाडले व शेड मधील तीन गाड्याही पलटी करुन नुकसान केले आहे. रात्री टस्कर हत्ती बिथरल्याने मोठ्याने चित्कारत होता. त्यामुळे भयभीत झाल्याने फर्नांडीस यांच्या घरातून कोणीही बाहेर आले नाही. आज, शुक्रवारी सकाळी शेड पाडून गाड्या पलटी केल्याची त्यांच्या निदर्शनास आले.