साखर उत्पादन ४५ टक्क्यांनी घटणार : राज्यातील गळीत हंगामाला शुक्रवारचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:58 PM2019-11-20T12:58:51+5:302019-11-20T13:00:47+5:30

कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या ...

Friday is the coldest season in the state | साखर उत्पादन ४५ टक्क्यांनी घटणार : राज्यातील गळीत हंगामाला शुक्रवारचा मुहूर्त

साखर उत्पादन ४५ टक्क्यांनी घटणार : राज्यातील गळीत हंगामाला शुक्रवारचा मुहूर्त

googlenewsNext
ठळक मुद्दे सचिव समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत येत्या शुक्रवार (दि. २२)पासून गळीत हंगाम सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसाची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याने यंदाचा हंगाम ७० ते ९० दिवसच चालेल आणि उत्पादनातही तब्बल ४५ टक्क्यांनी घट येईल, असा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर आणासकर, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी राजभवनात बैठक झाली. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यासमोर गळीत हंगाम सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय झाला. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये मंत्री समितीची बैठक होऊन गाळप हंगामाचा आढावा घेतला जात होता. यंदा मात्र सरकार बरखास्त झाल्याने मंत्री समितीही बरखास्त झाली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच मंत्री समितीची स्थापना होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आणखी चार दिवसांनी एक महिना होणार असला तरी अजूनही सरकार स्थापन झालेले नसल्यामुळे गळीत हंगामाचा निर्णय कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सचिव पातळीवर बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यात आला.

या संदर्भात गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बैठकीचा तपशील सांगताना येत्या शुक्रवारपासून गळीत हंगाम सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यातील १६२ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवान्याची मागणी आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी कोणतीही थकबाकी नसलेल्या १०५ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. या कारखान्यांचा गळीत हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ५७ कारखान्यांचे गाळप परवाने राखून ठेवण्यात आले आहेत. त्यातही १५ कारखान्यांचा विषय न्यायालयात असल्यामुळे त्यांची सुनावणीही २२ लाच होणार आहे. या सुनावणीनंतरच त्यांच्या गाळप परवान्याचे भवितव्य ठरणार आहे. या कारखान्यांनी ‘एफआरपी’सह अन्य देणी थकवली असल्याचे परवाना प्रस्ताव छाननीत आढळले आहे.

हंगाम ७० ते ९० दिवसच चालणार
महापूर, अतिवृष्टी आणि त्यापाठोपाठ परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे यंदा राज्यात उसाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम केवळ ७० ते ९० दिवसच चालणार आहे. १८० ते २२० दिवस गाळपाचा उच्चांक नोंदविणाऱ्या राज्यातील कारखान्यांचा यंदा गाळप कालावधीचा नीचांक होणार आहे.

४९ लाख मेट्रिक टनांनी उत्पादन घटणार
राज्यात यंदा तब्बल ४९ लाख मेट्रिक टनांनी साखरेचे उत्पादन घटेल, असा अंदाज या सचिव समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षी १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, ते यंदा ५८ लाख मेट्रिक टनांपर्यंत खाली येणार आहे. ही घट तब्बल ४५ टक्के आहे.
 

Web Title: Friday is the coldest season in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.