Kolhapur: पन्हाळगडावर गव्यांचा मुक्तसंचार, पर्यटकांना घडले जवळून दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:49 IST2025-05-02T12:48:46+5:302025-05-02T12:49:36+5:30
पन्हाळा : पन्हाळ गडाचा साधोबा दर्गा, परिसरात चार गव्यांनी काल, गुरुवारी दिवसभर मुक्तसंचार केला. गव्यांना पाहण्यासाठी पर्यटक व नागरिकांनी ...

Kolhapur: पन्हाळगडावर गव्यांचा मुक्तसंचार, पर्यटकांना घडले जवळून दर्शन
पन्हाळा : पन्हाळगडाचा साधोबा दर्गा, परिसरात चार गव्यांनी काल, गुरुवारी दिवसभर मुक्तसंचार केला. गव्यांना पाहण्यासाठी पर्यटक व नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने गडावर पर्यटकांची संख्या जास्त होती. यातच गवे रस्त्यावरुन फिरु लागल्याने पर्यटकांना गवे जवळुन पाहण्याची संधी मिळाली. तर पन्हाळ्यावरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
दुपारच्या सुमारास लता मंगेशकर यांच्या बंगल्याकडून साधोबा तलावा जवळील आनंद जगताप यांच्या घराजवळ चार गवे पन्हाळ्यावर आले. गव्यांना पाहण्यासाठी पर्यटकासह नागरिकांनी गर्दी झाली. यावेळी त्यातील एक गवा कुंपणावरुन उडी मारुन मंगळवार पेठच्या दिशेने गेला. बाकीचे तीन गवे विठोबा माळाकडे परत गेले. मंगळवार पेठेकडे गेलेला गवा रात्री परत आला तो वीर शिवा काशिद पुतळ्या खाली मध्यरात्री पर्यंत उभा होता.
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आलेच नाहीत
लोकांनी आरडाओरडा केल्याने गवे बिथरले व मंगेशकर बंगला परिसरात सैरावैरा धावू लागले. हा प्रकार जवळपास चार, पाच तास सुरू होता. वनविभागाचे या ठिकाणी कोणीही आले नाही. नागरिकांनी गव्यांना रेडेघाट जंगलात हुसकावून लावले. दोन गवे हे पूर्ण वाढ झालेले असल्याचे कांही नागरिकांनी सांगितले. वनविभाग गव्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करत नसल्याने गवे गावात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.