करवीरच्या तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर फसवणूकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:46 IST2019-02-19T15:45:59+5:302019-02-19T15:46:55+5:30
बालिंगा (ता. करवीर) येथील जमीन गट नंबर २३७ जमीनीचे मयताच्या नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदवून जागेचे सहा हिस्से करुन फसवणूक केल्याप्रकरणी करवीरच्या दोघा तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.

करवीरच्या तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर फसवणूकीचा गुन्हा
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील जमीन गट नंबर २३७ जमीनीचे मयताच्या नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदवून जागेचे सहा हिस्से करुन फसवणूक केल्याप्रकरणी करवीरच्या दोघा तत्कालीन तहसिलदारांसह सतरा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.
संशयित तहसलिदार योगेश भिमराव खरमाटे, उत्तम विठ्ठल दिघे, मंडल अधिकारी शंकर एन. नांगरे, तलाठी शरद मारुती नलवडे, भुमी अभिलेख उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे, जिनगोंडा यशवंत पाटील, आशा जिनगोंडा पाटील, मुवर रशिद पठाण (रा. सांगली वेश इचलकरंजी), वैष्णवी हरीष राणे, संजय शिवाजीराव पवार (रा. राजारामपूरी), प्रदीप पांडुरंग इंगवले (शिवाजी पेठ), उमेश राजाराम झंजे (कावणे, ता. करवीर), सरिता दिनकर माने (जरगनगर), इंद्रजित बाबुराव पाटील, बाबुराव सिताराम पाटील (दोघे रा. कळंबा, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, फिर्यादी शांताराम श्रीपती माळी (रा. बालिंगा) यांच्या मालकीची गट नंबर २३७ मध्ये जमीन आहे. संशयितांनी सहहिस्सेदार मृत रामचंद्र बाबु माळी यांचे नावे असलेल्या बनावट वटमुखत्यारपत्राचे आधारे दस्त नोंदविला. त्यानंतर बनावट गुंठेवारी आदेशाचा वापर करुन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या खोट्या सह्या करुन गुंठेवारी आदेशाप्रमाणे मोजणी करुन जागेचे सहा पोट हिस्से करुन घेतले.
आपल्या मालकीच्या जागेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माळी यांनी जिल्हा न्यायालयात संशयितांच्या विरोधात याचिका दाखल केली. न्यायालयाने करवीर पोलीसांना यासंबधी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.
सध्या संशयित उत्तम दिघे हे वर्धा येथे उपजिल्हाधिकारी तर योगेश खरमाटे हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदारपदी कार्यरत आहेत. वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे.