'युपीएससी'त कोल्हापूरच्या चौघांचा झेंडा, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील दोघांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:48 IST2025-04-23T12:48:33+5:302025-04-23T12:48:44+5:30
लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर : १ हजार ९ जणांची गुणवत्ता यादी

'युपीएससी'त कोल्हापूरच्या चौघांचा झेंडा, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील दोघांची बाजी
कोल्हापूर : संघर्षमय परिस्थतीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करत कोल्हापुरातील चौघांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या २०२४ नागरी सेवा परीक्षेत यशाचा लखलखीत झेंडा फडकवला आहे. जयसिंगपूर येथील आदिती संजय चौगुले, यमगे (ता. कागल) येथील बिरदेव सिद्दाप्पा डोणे व फुलेवाडी येथील हेमराज हिंदुराव पनोरेकर तर जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील दिलीपकुमार कृष्णा देसाई यांनी या परीक्षेत यश मिळवले. कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील रोहन पिंगळे व हृषीकेश वीर यांनीदेखील या परीक्षेमध्ये बाजी मारली.
यूपीएससीने १६ जून २०२४ ला ही परीक्षा घेतली. २० ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मुख्य परीक्षा होऊन जानेवारी ते एप्रिल २०२५ मध्ये मुलाखती पार झाल्या. त्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. तब्बल १ हजार ९ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली. यात जयसिंगपूर येथील आदिती चौगुले यांनी ६३ रँक यूपीएससीत यश मिळवले. गतवर्षी ४३३ वी रँक घेऊन पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले होते. यंदा पुन्हा परीक्षा देऊन देशभरात ६३ वी रँक मिळवून दुसऱ्यांदा यश मिळवले. दिलीपकुमार देसाई यांनी ६०५ रँक मिळवली.
बिरदेव डोणे हे यमगे गावचे रहिवासी असून, त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच घेतले. बारावीचे शिक्षण शिवराज ज्युनिअर कॉलेज मुरगुड येथे पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले. तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीत यश संपादन करीत ५५१ वी रँक मिळवली. कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील रोहन पिंगळे यांनी ५८१ वी रँक मिळवली. ते पुणे येथील आहेत. हृषीकेश वीर हे गोवा येथील असून, त्यांनी ५५६ रँक मिळवत परीक्षेत यश संपादन केले.
सेल्फ स्टडीवर यशाची पताका
बोंद्रेनगर येथील जिल्हा परिषद कॉलनी परिसरातील हेमराज पनोरेकर यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. त्यांनी ९२२ वी रँक मिळवली असून, आई संगीता पनोरेकर गृहिणी आहेत. वडील खासगी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण रा. ना. सामानी विद्यालयात झाले तर बारावीपर्यंतचे शिक्षण कागल येथील नवोदय विद्यालय येथे पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. कोणताही क्लास न लावता घरात राहून सेल्फ स्टडी करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
जांभूळवाडीच्या युवकाने करून दाखवले
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक आणि गावातील हायस्कूलमध्येच माध्यमिक शिक्षण घेतलेल्या माजी सैनिकाच्या मुलाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६०५ वा क्रमांक पटकावला. भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) उच्चपदाला त्याने गवसणी घातली. दिलीपकुमार कृष्णा देसाई असे पाचशे लोकवस्तीच्या जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज ) गावातील या जिद्दी तरुणाचे नाव आहे.