कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर २ एकर, भवानी मंडप ३ एकरात आहे. हेरिटेजअंतर्गत २ एकराचा परिसर आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त मंदिर विकास आराखड्यासाठी परिसरातील साडेचार एकराचे संपादन करावे लागणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील संपादन कमी आहे, त्याबाबत नागरिकांना विश्वासात घ्या, पुढील आठ दिवसात आराखडा मंजुरीचा अध्यादेश निघेल, त्यानंतर तातडीने पुढील सर्व प्रक्रिया करून आराखडा कालबद्ध वेळेत पूर्ण करावा, अशी सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी केली.मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाबाई मंदिराच्या १४५० कोटींच्या व जोतिबा मंदिराच्या २५० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्या पार्श्वभूमीवर हे आराखडे कसे राबवले जातील याबाबत बुधवारी सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अंबाबाई मंदिराचा एकूण आराखडा साडे अकरा एकराचा असून, त्यापैकी फक्त साडे चार एकराचे संपादन करावे लागणार आहे.
अध्यादेश येताच कार्यवाही सुरू करा
अंबाबाई, जोतिबा आराखड्याचा अध्यादेश ८ दिवसात येईल. त्यानंतर तातडीने संबंधित विभागांनी अंदाजपत्रक तयार करून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा, अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निविदा या सर्व प्रक्रिया तातडीने करून घ्या. त्यानुसार निधी येताच कामाला सुरुवात करा. दरम्यान, संपादन क्षेत्रातील नागरिकांना विश्वासात घ्या, योग्य नुकसानभरपाई द्या, टीडीआर देता येतो का याचा विचार करा, अशा सूचना मंत्री आबिटकर यांनी दिल्या.
अंबाबाईचा पहिला टप्पा असा
- मूळ मंदिराच्या अंतर्गत सुधारणा
- संपादन : बिनखांबी गणेश मंदिर ते विद्यापीठ हायस्कूल.
- हेरिटेज : भवानी मंडप, पागा बिल्डिंग, मणिकर्णिका.
- मिळकती : १३९
- एकूण खर्च : ५०० कोटी
- भूसंपादनासाठीची रक्कम : २५७.९४ कोटी
- बांधकाम, सुधारणांची रक्कम : २०० कोटी
जोतिबाचा पहिला टप्पा असा
- खर्च : २६० कोटी
- मूळ मंदिर संवर्धन, यमाई मंदिर संवर्धन
- पायवाटातील सुविधा : २१ कोटी
- मुरलीधर पुष्करणी - १०.२० कोटी
- चव्हाण तलाव : २०.४० कोटी
- कर्पूर तलाव : ७.६५ केटी
- नवे तळे परिसरात १२ जोतिर्लिंग प्रतिकृती : २५.५० कोटी
- ज्योती स्तंभ : १५.३० कोटी
- चाफेवन : १०.२० कोटी
- केदार विजय गार्डन : २०.४० कोटी