‘गडहिंग्लज’चे जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 09:00 PM2023-10-14T21:00:08+5:302023-10-14T21:03:15+5:30

८७व्या वर्षी अल्पशा आजाराने झाले निधन

Former Janata Dal MLA of Gadhinglaj Advocate Shripatrao Shinde passed away | ‘गडहिंग्लज’चे जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निधन

‘गडहिंग्लज’चे जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निधन

राम मगदूम, कोल्हापूर: ज्येष्ठ समाजवादी नेते, जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष आणि ‘गडहिंग्लज’चे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव दिनकरराव शिंदे ( वय ८७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सायंकाळी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिलादेवी, कन्या डॉ. रचना संजय थोरात (कराड), प्रा. स्वाती महेश कोरी (माजी नगराध्यक्षा,  गडहिंग्लज), चार भाऊ, बहिण,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

महिन्यापूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर कराड येथील थोरात हॉस्पिटलमध्ये व नंतर पुण्यात  उपचार सुरू होते. दरम्यान, हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यामुळे रक्तदाब कमी होवून किडनीची क्रिया मंदावली. त्यामुळे त्यांना डायलेसीस व आॅक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
तथापि, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील ‘रुबी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने रस्त्यावरच्या लढाईतून घडलेल्या नेतृत्वाची, एका संघर्षयात्रीची अन् एका झंझावाताची अखेर झाली.

गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल हे त्यांचे जन्मगाव.  बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वत:च्या घरात खाजगी शाळा चालवणारे वडील दिनकरमास्तर यांचे संस्कार आणि राष्ट्र सेवा दलात त्यांची जडणघडण झाली. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजवादी विचाराची कास सोडली नाही. सुरुवातीला कांहीकाळ त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर गडहिंग्लज येथील न्यायालयात वकिली केली.
दरम्यान, समाजवादी पक्षाच्या कामाबरोबरच  विविध सामाजिक प्रश्नावर त्यांनी जनआंदोलने उभारली. देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन, पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका, एस.टी., नगरपालिका व साखर कामगार, शेतकरी-शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आणिबाणीच्या काळात तब्बल दीड वर्षाचा तुरूंगवासही त्यांनी भोगला होता.
‘सायबर’चे संस्थापक दिवंगत डॉ. ए. डी. शिंदे, दिवंगत माजी उपायुक्त वसंतराव शिंदे, पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष डॉ. विजयराव शिंदे यांचे ते बंधू तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ.  जयसिंगराव चव्हाण यांचे ते मेव्हुणे होत.

 

Web Title: Former Janata Dal MLA of Gadhinglaj Advocate Shripatrao Shinde passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.