ZP, पंचायत समिती मतदारसंघाची रचना राजकीय दबावाखाली; प्रकाश आवाडेंच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 12:44 IST2022-05-20T12:28:38+5:302022-05-20T12:44:32+5:30
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची रचना राजकीय दबावाखाली करण्यात आल्याची आमदार प्रकाश आवाडे यांची तक्रार

ZP, पंचायत समिती मतदारसंघाची रचना राजकीय दबावाखाली; प्रकाश आवाडेंच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची रचना राजकीय दबावाखाली करण्यात आल्याच्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या लेखी आरोपाची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना ९ मे २०२२च्या परिपत्रकानुसार रचना करताना दक्षता घेण्याबाबत सूचना करणारे पत्र गुरुवारी पाठवण्यात आले आहे.
हातकणंगले तालुक्यातील राजकीय लोकांच्या दबावाखाली राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेच्या विरोधात जाऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप नकाशे केल्याची आवाडे यांनी सर्व पुराव्यानिशी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेण्यात आली आहे. ९ मेच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रभागरचना करण्याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांनाही ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता याबाबत जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे हातकणंगले तालुक्याचे लक्ष लागले आहे.
..तर हक्कभंग दाखल करणार
राज्य निवडणूक आयोगाने आदेश येऊनही जर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ मे २०२२ रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रभाग प्रारूप नकाशे केले नाही तर जिल्हाधिकारी कोल्हापूर व तहसीलदार हातकणंगले यांच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असून, येणाऱ्या अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.